Akola : चला जाणून घेऊ कृषीचे नवतंत्रज्ञान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Agricultural University

Akola : चला जाणून घेऊ कृषीचे नवतंत्रज्ञान

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निर्मित तंत्रज्ञान, पीक वाण तथा परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना उद्‍भवणाऱ्या शेती विषयक प्रश्नांचे शास्त्रज्ञांसोबत चर्चेद्वारे शंकासमाधान करण्याच्या हेतूने विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधून दरवर्षी खरीप शिवार फेरीचे आयोजन अकोला येथील कृषी विद्यापीठाच्या मुख्यालयी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे करण्यात येते.

यावर्षी शिवार फेरीचे आयोजन १८ ते २० ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. या तीन दिवसीय शिवार फेरीचे उद्‍घाटन मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता शेतकरी सदन येथे संपन्न होणार आहे. शेतकऱ्यांची नोंदणी नंतर विद्यापीठाच्या वाहनाद्वारे विविध प्रक्षेत्र व संशोधन विभागांना प्रत्यक्ष भेटी देण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. उपरोक्त तीनही दिवशी सकाळी ९ वाजतापासून नोंदणी शेतकरी सदन येथे करता येणार आहे.

या शिवार फेरीदरम्यान शेतकऱ्यांच्या विद्यापीठ प्रक्षेत्रावरील फुले, फळे, भाजीपाला, कडधान्य, तेलवर्गीय, मसालावर्गीय, पारंपरिक, नवसंशोधित व अधिक उत्पादन देणाऱ्या पीक वाणांचे अवलोकन करता येईल तसेच पिकांचे संरक्षण, सेंद्रिय शेती पद्धती, कीड व रोग नियंत्रणाच्या साध्या सोप्या पद्धती, जैविक निविष्ठा तयार करण्याच्या पद्धती सविस्तर जाणून घेता येईल. याचवेळी विद्यापीठाद्वारे संशोधन विविध कृषी यंत्र, त्यांचा वापर, पद्धत व त्यापासून होणारे फायदे, सोबतच गाव पातळीवर कृषी माल प्रक्रिया स्थापन करणे संदर्भात सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे.

या शिवार फेरीच्या निमित्ताने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक समस्यांचे तज्ज्ञांकडून वेळीच निरासन करण्याची ही सुवर्णसंधीच आहे. विदर्भासह राज्यातील सर्वच विभागातील शेतकऱ्यांनी या शिवार फेरीचा लाभ घ्यावा व येणारा हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी केले आहे.