Akola and Buldhana Lok Sabha Election : विजयाची माळ माझ्याच गळ्यात! उमेदवारांनी केला विजयाचा दावा

लोकसभा निवडणूकीसाठी २६ एप्रिलरोजी मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांनाच उद्याच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.
Buldhana Lok Sabha Election 2024
Buldhana Lok Sabha Election 2024sakal

अकोला - लोकसभा निवडणूकीसाठी २६ एप्रिलरोजी मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांनाच उद्याच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. मतदारांप्रमाणेच सर्वाधिक उत्कंठा लागली आहे ती उमेदवारांना. कारण यावेळेसारखी अटीतटीची लढत याआधीच्या निवडणूकांमध्ये पहायला मिळाली नाही. यावेळेच्या निवडणूकीत अकोला व बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील पहिल्या तीन प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी विजयाची माळ माझ्याच गळ्यात पडणार असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात चित्र निकालानंतर स्पष्ट होईल.

तब्बल सव्वा महिन्यानंतर मंगळवारी निकालाची प्रतिक्षा संपणार आहे. वऱ्हाडातील अकोला व बुलडाणा दोन्ही मतदारसंघात चुरशीची लढत पहायला मिळाली. अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे व काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांच्यात थेट लढत झाली असली तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर यांना मिळणारी मते ही निर्णायक ठरणार असून यावर अकोला लोकसभेचा निकाल अवलंबून आहे.

तर बुलडाणा लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवार शिवसेनेचेच होते. प्रतापराव जाधव यांच्याविरोधात नरेंद्र खेडेकर हे उभे राहिले तर रविकांत तुपकर यांनीही प्रतापरावांसमोर मोठी अडचण निर्माण केल्याचे पहायला मिळाले. रविकांत तुपकरांनी जास्तीत जास्त मते घेतली तर त्याचा फटका प्रतापराव जाधवांना बसणार असल्याचा धोका आहे.

दोन्ही मतदारसंघात मतांची टक्केवारी फारशी वाढली नसल्याने विजयी उमेदवार कमी मताधिक्क्याने विजयी होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारेल हे शेवटी निकालानंतर चित्र स्पष्ट होईलच.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघ

गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती व महाविकास आघाडी अशी सरळ लढत होती. त्यावेळी मतदारांनी सुमारे दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून दिले होते. या वेळची परिस्थिती वेगळी आहे शिवसेना व राष्ट्रवादी दोन भागांमध्ये विभागली गेली आहे. यावेळी ही लढत तिरंगी झाली असल्याने कोणत्या उमेदवारांनी कोणाची मते घेतली? याबाबत संभ्रम आहे. मात्र माझी स्वतःची व मोदी सरकारची कामगिरी दमदार असल्याने आपण निश्चिंत असून सुमारे एक लाखाच्या फरकाने आपला विजय होईल असा विश्वास आहे.

- प्रतापराव जाधव, उमेदवार, शिवसेना (शिंदे गट)

एका सर्वसामान्य उमेदवाराच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी राहिली व माझी लढाई जनतेने लढली आहे. माझी सर्व लढाई ही सर्वसामान्यांची लढाई होती व प्रस्थापितांविरोधात व जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचा शोषणाच्या विरोधातली ही लढाई होती. आपण कुण्या व्यक्तीच्या विरोधात लढलो नसून प्रवृत्तीच्या विरोधात लढलो. सर्व जातीपाती राजकीय पक्ष गरीब श्रीमंत अशा अनेक लोकांनी आपल्याला भक्कम पाठिंबा दिला. आपला विजय हा जनतेचा विजय असणार एवढे निश्चित !

- रविकांत तुपकर, उमेदवार (अपक्ष)

ज्या शिवसेनेने खासदार प्रतापराव जाधव यांना तीन तीन वेळा आमदार मंत्री खासदार केले, त्या शिवसेनेसोबत प्रतापरावांनी गद्दारी केलेली जनतेला आवडलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता विद्यमान खासदारा विरोधात आक्रमक होती. या निवडणुकीत आपला विजय हा उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतरच निश्चित झाला होता. आता उद्याच्या निकालाने दोन लाखाच्या फरकाने आम्ही जिंकून येऊ व त्यावर शिक्कामोर्तबच होईल.

- नरेंद्र खेडेकर, उमेदवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

अकोला लोकसभा मतदारसंघ

अकोला लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत जी विकास कामे झाली, त्याचे फलीत निश्चित मतांच्या माध्यमातून मिळणार आहे. युवक व महिलांसाठी ज्या लोकहिताच्या योजना राबविण्यात आल्या. त्याचा फायदा निश्चित होणार आहे. मतदारराजावर आमचा पुर्ण विश्वास आहे. याआधी सुद्धा जनतेचा भरभक्कम पाठिंबा भाजपाला राहिला आहे. याहीवेळेस निश्चित भाजपाचाच विजय होवून अकोला लोकसभा मतदारसंघात कमळ निश्चित फुलेल. तीन लाखाच्या मताधिक्क्याने आमचा विजय होवून अकोला लोकसभेचा गड पाचव्यांदा अभेद्य ठेवू हा विश्वास आहे.

- अनुप धोत्रे, उमेदवार, महायुती

अकोला लोकसभा मतदारसंघात मागील ३० वर्षापासून पाहिजे तसा विकास झालेला नाही. मागील चार वर्षापासून जनतेने खासदार पाहिलेच नव्हते. प्रचारादरम्यान मतदारांमधून तीव्र नाराजीचा सूर समोर आला. शिवाय मतदारसंघातील अनेक प्रलंबीत विषय यानिमित्ताने समोर आले. ज्यावर भविष्यात काम करता येईल. त्यामुळे विकास कामे होवू शकली नाहीत. जनमताचा पाठींबा निश्चित आमच्यासोबत असेल हा ठाम विश्वास आहे.

- डॉ. अभय पाटील, उमेदवार, महाविकास आघाडी

नेमकं अकोल्याचे चित्र काय असणार आहे हे ४ जूनलाच मतपेटीतून बाहेर पडणार आहे. पण मी आधीच सांगितलं होतं की मोदी हे पंतप्रधान बनणार नाहीत. इलेक्शन एवढं लांबवणं हे चुकीचं आहे, यानंतर एकाच दिवशी हे मतदान घेण्यात यावं. मोदींना सातत्याने टीव्हीवर दाखवल्या जाते हाच प्रचार होताना आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र निवडणूक आयोग आता मोदीवर काही कारवाई करणार का...? मोदी हा एक स्टंटबाज आहे, एक चांगला ऍक्टर आहे, याला एखाद्या ऍक्टिंग प्राइज मध्ये पाठवण्यात यावं आणि देव कधी सामान्य माणसाकडे काही मागत नाही. त्यामुळे ही एक मोदींची स्टंटबाजी आहे, थोतांड आहे, हा सर्वात मोठा फ्रॉड असल्याचं आम्ही मानतो.

- ॲड. प्रकाश आंबेडकर, उमेदवार, वंचित बहुजन आघाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com