Akola : पन्नास हजार वर्षांनी पृथ्वीजवळ येतोय नवा धुमकेतू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुमकेतू

Akola : पन्नास हजार वर्षांनी पृथ्वीजवळ येतोय नवा धुमकेतू

पातूर : निरभ्र आकाशात आपण चंद्रा सोबत विविध ग्रह- ताऱ्यांचे निरीक्षण करतानाच कधी उल्कावर्षाव व अधुनमधून येणाऱ्या धुमकेतूंचे दर्शन घेत असतो. असाच एक नवा धुमकेतू पृथ्वीच्या जवळ येत असल्याने त्याचे दर्शनार्थ खगोल अभ्यासक व आकाश प्रेमी सज्ज होत असल्याची माहिती विश्वभारती केंद्राचे प्रभाकर दोड यांनी दिली.

धुमकेतू हे सुद्धा सूर्यकुलाचे घटक असून ते सूर्याभोवती फिरताना जेव्हा पृथ्वी जवळ येतात तेव्हा त्यांची शेपटी लांबलचक स्वरुपात दिसते. त्याला ग्रामीण भागात ‘शेंडे नक्षत्र’ असे म्हणतात. बहूतांशी गोठलेले वायू, खडक, व धुलीकणांनी बनलेले हे धुमकेतू दीर्घ वर्तुळाकार मार्गाने फिरताना काही वस्तूकण मागे सोडतात व ते उल्कांचे रुपाने बघता येतात.

असाच एक नवीन धुमकेतू ‘सी/२०२२ ई ३ (झेडटीएफ) सध्या पृथ्वीच्या जवळ येत आहे. त्याचे अंतर ता. १ फेब्रुवारीला सुमारे चार कोटी किलोमीटर एवढे कमी होत असल्याने याचे दर्शन शक्य होईल . यावेळी त्याची दृष्य प्रत सहा एवढी असेल.

गत वर्षी मार्चमध्ये लागला होता शोध

या धुमकेतूचा शोध ता. २ मार्च २०२२ ला गुरू ग्रहाचे कक्षेतून झ्विस्की ट्रान्सिएंट यांनी अमेरिकेतून लावला. हा धुमकेतू उत्तरेकडे दिसणाऱ्या धृव व सप्तर्षी तारका समूहाजवळ पाहता येईल. पन्नास हजार वर्षांनी येणारा या आकाशातील अनोख्या पाहूण्याचे स्वागतासाठी संपूर्ण जगातील खगोल अभ्यासक व आकाश प्रेमी सज्ज होत आहेत. भारतातून याचे निरीक्षण चांगल्या प्रकारे करता येईल.

यापूर्वीही अनुभवला होता धूमकेतू

या आधी धूमकेतूंचा राजा म्हणून ओळख असलेला ‘हॅलेचा धुमकेतू’ जो अनेकांनी सन १९८६ या वर्षी पाहिला असेल. त्यापूर्वी १९१० साली हा धुमकेतू भरदिवसा सुध्दा दिसत असे. असा हा नववर्षाच्या प्रारंभी आकाशात दाखल होणारा हिरव्या रंगाचा धुमकेतू सर्वांनी अवश्य बघून आपले आकाशाशी नाते अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सज्ज व्हायला हवे, असे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले.