कौतुकास्पद: आशुतोष व निकिताचा बोहल्यावरच अवयवदानाचा संकल्प

प्रा.अविनाश बेलाडकर 
Thursday, 30 July 2020

सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने बोहल्यावर सपत्निक अवयवदानाचा संकल्प करून आपल्यातील कर्त्या सुधारकाचा परिचय दिला.

मूर्तिजापूर (जि.अकोला) :  सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने बोहल्यावर सपत्निक अवयवदानाचा संकल्प करून आपल्यातील कर्त्या सुधारकाचा परिचय दिला.

उक्तीला कृतीची जोड देण्याइतके कठीण काम अन्य कुठलेच नाही, परंतु ते शक्य करून दाखविणा-या या सुधारणावाद्याचे नाव आहे आशुतोष भेले. त्याला तेवढीच समर्थ साथ देणारी निकिता त्याची अर्धांगिनी आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

काल या दोघांचा विवाह चांदुर रेल्वे तालुक्यातील बासलापूर येथे संपन्न झाला. लग्नसोहळा पार पडल्यानंतर बोहल्यावरच या नवदाम्पत्याने आवयवदानाचा संकल्प जाहीर केला.

परतवाड्याच्या पुनर्जीवन फाऊंडेशनच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून अवयवदानाची चळवळ राबविल्या जात आहे. त्या चळवळीत सहभागी होत बऱ्याच समाजभान जपणाऱ्यांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे. पुनर्जीवन फाऊंडेशनच्या माध्यमातून दोघांनी, तर मृत्यूनंतर अवयवदान करून इतरांना जीवनदान दिले आहे. मृत्यूनंतर शरीराचा कुठलाच भाग कामात येत नसला, तरी तो एखाद्या आजारी व्यक्तीस नवजीवन देणारा ठरू शकतो.

या सामाजिक भावनेतून आशुतोष व निकिता यांनी विवाहाच्या दिवशीच अवयवदानाचा संकल्प करीत आदर्श निर्माण केला. यावेळी लग्न मंडपात उपस्थित असणाऱ्या वऱ्हाडी मंडळी समोर चळवळीची भूमिका 'पुनर्जीवन'चे अध्यक्ष डॉ. राजेश उभाड यांनी विशद केली. याप्रसंगी जितेंद्र रोडे, अँड प्रशांत गाठे, विश्राम कुलकर्णी, डॉ. हर्षराज दफडे आदी 'पुनर्जीवन' सदस्य उपस्थित होते. मधुसूदन भेले, बाळाभाऊ कूरळकर, गजानन होले, गंगाधन वाघ देवीदासराव कुबडे यांचीही उपस्थिती होती.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Ashutosh and Nikitas decision to donate organs only after Bohala