बाळापुरात आढळला दुर्मिळ ‘लियू सिस टिक लिटिल डव’

अनुप ताले 
Tuesday, 4 August 2020

दुर्मिळ असा पांढरा छोटा होला/भोरी (लियू सिस टिक लिटिल डव) अकोला येथील निसर्ग प्रेमी आणि निसर्ग संवर्धक शेख मोहम्मद उर्फ मुन्ना शेख, यांना बाळापूर तालुक्यात दिसून आला आहे.

अकोला  ः दुर्मिळ असा पांढरा छोटा होला/भोरी (लियू सिस टिक लिटिल डव) अकोला येथील निसर्ग प्रेमी आणि निसर्ग संवर्धक शेख मोहम्मद उर्फ मुन्ना शेख, यांना बाळापूर तालुक्यात दिसून आला आहे.

तपकिरी होला/भोरी, मैनेपेक्षा मोठा, सडपातळ आणि लांब शेपूट असलेला असतो. या पक्ष्याची खालील बाजू व डोके तपकिरी-गुलाबी, वरील बाजू एकसमान, छातीच्या वरच्या बाजूवर काळ्या ठिपक्यांचा पट्टा असतो. मात्र मुन्ना शेख यांना आढळलेला पक्ष्यामध्ये तपकरी रंगाऐवजी पांढरा रंग विकसीत झालेला दिसून येतो.

जेणेकरुन हा पक्षी दुर्मिळ झाला आहे. पक्षी तज्ज्ञांनी याला लियू सिस टिक लिटिल डव (पांढरा छोटा होला/भोरी), असे नाव दिले आहे. या दुर्मिळ पांढऱ्या होल्याला जगासमोर आणण्याचे कार्य मुन्ना शेख यांनी केल्याबद्दल निसर्ग प्रेमिंकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

काय म्हणतात तज्ज्ञ?
प्राणीशास्त्र अभ्यासक पिंपळगाव काळे येथील प्राचार्य डॉ. राजा यांचेशी मुन्ना शेख यांनी संपर्क साधला असता, आढळलेल्या या पक्षांमध्ये ल्युझिझम किंवा ल्यूकिझम आहे, जी अनुवंशिक उत्परिवर्तन मुळे होणारी एक असामान्य पंखाची स्थिती आहे. जी रंगद्रव्य, विशेषत: मेलेनिनला पक्ष्याच्या पंखांवर योग्यरित्या जमा होण्यापासून प्रतिबंधित करते. याचा परिणाम म्हणून, पक्षी सामान्य, क्लासिक पिसाऱ्याचा रंग न दाखवता फिकट किंवा पांढरा रंग दाखवतो. लिऊसिझम असलेल्या पक्ष्यांना जंगलात विशेष आव्हानांचा सामना करावा लागतो. फिकट पिसारा बचावात्मक नसतो म्हणून, ते त्यांना अधिक असुरक्षित बनवू शकतो. जोडपं तयार करण्यात पिसाराचे रंग महत्वाची भूमिका बजावतात म्हणून, असे पक्षी प्रजननासाठी मजबूत, निरोगी जोडीदार शोधण्यात अक्षम असू शकतात. मेलेनीन देखील पंखांचा एक महत्त्वाचा स्ट्रक्चरल घटक आहे. जे पंखांना मजबूती प्रदान करते. म्हणून या पक्ष्यांमध्ये पंखाही कमजोरी असू शकते आणि लवकर झडून पडतात. अशा या असामान्य पक्ष्याला जीवन जगणं थोडा कठीण असू शकते.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola balapur marathi news Rare Liu sis tik Little Dove bird found in Balapur