Akola : बॅंक कर्मचाऱ्यांचा संप; व्यवहार खोळंबले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संप

Akola : बॅंक कर्मचाऱ्यांचा संप; व्यवहार खोळंबले

अकोला : विविध प्रकारच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र बॅंक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २७) संप केला. युनायटेड फाेरम ऑफ महाबॅंक युनीयनच्या झेंड्याखाली एकत्र येत कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाच्या विरोधात आणि विविध मागण्यांच्या समर्थनार्थ निदर्शने केली. सदर संपामुळे बॅंकेचे व्यवहार खोळंबले असून त्याचा त्रास ग्राहकांना झाला.

बॅंकेत एक हजार १००पेक्षा जास्त शाखेत कायमस्वरुपी सफाई कर्मचारी नाहीत. सहाशे पेक्षा जास्त शाखेतही कायमस्वरुपती शिपाई नाहीत. गत पाच वर्षात मृत्यू, निवृत्ती, राजीनामा, पदाेन्नतीमुळे रिक्त झालेल्या जागांसाठीही भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. दरम्यान कर्मचारी भरतीसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र बॅंक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एक दिवसीय संप पुकारला.

निदर्शने करताना युनायटेड फाेरम ऑफ महाबॅंक कर्मचाऱ्यांचे नेते काॅ. माईणकर, कॉ. अतुल वर्मा, प्रवीण कुटारिया, गाैरव इंगाेले, प्रजय बनसाेड, दीपक लबडे यांनी संपाबाबत माहिती दिली. संप, निदर्शनासाठी अनील मावळे, अनील बेलाेकार, शुभांगी मानकर, शिल्पा ढाेले, प्रांजली भाले, देवलाल सिरसाट, अविनाश आखरे, सचिन क्षिरसागर, राम बगाडे, शैलेंद्र कुळकर्णी, शिव काकडे, हर्षित जैन, संदीप ओइंबे, सागर खवले आदींनी परिश्रम घेतले.

उलाढाल ठप्प

बॅंक कर्मचाऱ्यांच्या संपात अकाेला झाेनमधील सदस्य सहभागी झाले. झाेनमध्ये ३७० कर्मचारी असून, शाखांची संख्या ४७ आहे. तीन दिवसात झाेनमधील जवळपास १ हजार काेटींची उलाढाल ठप्प हाेणार असल्याचा दावा आंदाेलकांनी केला आहे.

या मागण्या प्रलंबित

लक्षणिक संपामागील भूमिका युनायटेड फाेरम ऑफ महाबॅंक युनीयनने स्पष्ट केली. संप प्रामुख्याने बॅंकेत सर्व कॅडरमध्ये नवीन नाेकर भरती करणे, द्विपक्षीय करारांचे पालन करणे आणि मनमानी प्रशासकीय बदली प्रक्रिया रद्द करणे, यासाठी आहे. या मागण्या मान्य हाेण्यासाठीच बॅक कर्मचारी रस्त्यावर उतरले असल्याचे युनायटेड फाेरमचे म्हणणे आहे.