अकोला : प्रतिबंधित 'गुटखा विक्री' करणाऱ्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola banned gutka sellers arrested

अकोला : प्रतिबंधित 'गुटखा विक्री' करणाऱ्यास अटक

अकोला : तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु. येथे प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदारावर अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईनुसार संस्कृती जनरल स्टोअर्स, अडगांव या दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच ३७ हजार ४२० रुपयांचा प्रतिबंधित मालाचा साठा जप्त करण्यात आला, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर तेरकर यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासन, अकोला कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी संस्कृती जनरल स्टोअर्स, अडगांव बु. या दुकानाची २९ एप्रिल रोजी तपासणी करून मालक सुनील केशवराव परळकर यांच्याकडून प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, तंबाखू जप्त केला. त्याची किंमत ३७ हजार ४२० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

याप्रकरणी दुकान मालक सुनील केशवराव परळकर (वय३३, रा. अंजनगांव रोड, गजानन मंदिराजवळ, गजानन नगर, अकोट), मुसा उर्फ अब्दुल मुसदीर अब्दुल नाजीक (रा. अडगांव बु.) तसेच असलम खान सनाउल्ला खान (रा. अडगांव बु) यांच्या विरूद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार आणि भादंविनुसार हिवरखेड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी मुसा उर्फ अब्दुल मुसदीर अब्दुल नाजीक तसेच असलम खान सनाउल्ला खान हे फरार असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

गुटख्यासह ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

गौरक्षण रोडवरील व्हिएचबी कॉलनी मैदान परिसरात एका दुचाकी वाहनावर प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी एमएच ३० वाय ६७२ क्रमांकाच्या दुचाकी तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपी पंकज जेठानी (रा. सिंधी कॅम्प) याला ताब्यात घेतले. या कारवाईत २५ हजार ४०० रुपयांचा विविध कंपनीचा गुटका, ३५ हजारांचे वाहन असा एकूण ६० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई खदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीरंग सनस यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.