बेरंग झाला श्रावण, पर्यटन क्षेत्राला कोट्यवधींचा फ़टका

विरेंद्रसिंह राजपूत
Wednesday, 22 July 2020

मॉन्सुनपासुन पर्यटनाचा हंगाम सुरु होतो. मात्र, कोरोनामुळे राज्यभरातील प्रेक्षणीय तसेच धार्मिक स्थळे बंद असल्याने ही स्थळे ओस सध्या ओस पडली आहेत. श्रावणमास असुनही पर्यटन बंद असल्याने निसर्गप्रेमींचा हिरमोड झाला आहे तर दुसरीकडे ऐन पर्यटन हंगामात पर्यटनाचे अर्थचक्र रुतल्याने या व्यवसायाला कोट्यवधींचा फ़टका बसण्याची चिन्हे आहेत.

नांदुरा (जि.बुलडाणा)  ः मॉन्सुनपासुन पर्यटनाचा हंगाम सुरु होतो. मात्र, कोरोनामुळे राज्यभरातील प्रेक्षणीय तसेच धार्मिक स्थळे बंद असल्याने ही स्थळे ओस सध्या ओस पडली आहेत. श्रावणमास असुनही पर्यटन बंद असल्याने निसर्गप्रेमींचा हिरमोड झाला आहे तर दुसरीकडे ऐन पर्यटन हंगामात पर्यटनाचे अर्थचक्र रुतल्याने या व्यवसायाला कोट्यवधींचा फ़टका बसण्याची चिन्हे आहेत.

पहिला पाऊस पडला की निसर्गप्रेमींची पावले पर्यटन स्थळांचा वेध घेतात. हिरवा निसर्ग पर्यटकांना खुणाऊ लागतो. देशविदेशातील पर्यटनाचे बेत आखले जातात. मात्र, यंदा सर्वच नियोजनावर पाणी फ़िरले आहे. कोरोनामुळे शासनाने खबरदारी म्हणुन पर्यटनस्थळांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यंदा पर्यटनाचे बेत रद्द करुन घरातच बसण्याची वेळ हौशींवर आली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

हा कालावधी कधी सुटेल या आशेवर पर्यटक आहेत तर दुसरीकडे पर्यटन हंगामाची आतुरतेने प्रतिक्षा करणार्या संबंधित व्यावसायिकांवरही लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. नुकताच श्रावणमासाला प्रारंभ झाला आहे. श्रावण म्हंटला की सगळीकडे आल्हाददायक वातावरणनिर्मिती झालेली असते. रंगबिरंगी फ़ुले-पाने-पक्षी पर्यटकांना खुणावत असते. यात धार्मिक स्थळांवर भेटी देणाऱ्यांची मोठी गर्दी असते. ट्रॅव्हल्स, हॉटेलिंग, गाईड आदी व्यवसायिकांना या हंगामाची आतुरतेने प्रतिक्षा असते. परंतु लॉकडाऊनमुळे संबंधित व्यावसायिक अडचणीत आले असुन श्रावणाचा बेरंग झाल्याचे चित्र सगळीकडे पहावयास मिळत आहे.

ट्रॅव्हल्सची चाके रुतली
छोट्या ते मोठ्या ट्रिपसाठी चारचाकी गाड्यांची बुकींग या दिवसांत जोरात असते. साधारणत: एका दिवस ते आठवडापर्यंतच्या ह्या ट्रिप असतात. यातुन चारचाकी ट्रॅव्हल व्यावसायिकांना चांगली कमाई होते. परंतु सध्या सर्वच बंद असल्याने ट्रॅव्हल्स उद्योग लोकडाऊन उठण्याच्या प्रतिक्षेत आहे.

हॉटेल्सची दारेही बंदच
या हंगामात पर्यटन व धार्मिक स्थळांवर जाऊन राहणाऱ्यांची संख्याही जास्त असते. मात्र, शासनाने हॉटेल्सला अद्याप परवानगी दिलेली नसल्याने हॉटेलिंग व्यवसाय डबघाईस आलेला आहे. या व्यवसायावर अवलंबुन शेफ़, आचारी, बुकींग, वेटर, हाऊस किपींग सर्वांवरच उपासमारीची वेळ आहे.

यंदा ऍडव्हेंचर टुरीझमच !
कोरोनामुळे यंदा टुरिझमवर शोककळा आहे. घरातच राहुन कोरोनाशी दोन हात करणे यालाच ऍडव्हेंचरस टुरिझम म्हणता येईल. आमच्याकडे एप्रील, मे, जुन महिन्यात युरोप टुर्सची रेलचेल असते. सोबतच केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री या चारधाम यात्रांची बुकिंग मोठी असते. या यात्रा वर्षातुन चार ते पाच महिन्यासाठीच असतात. व्यवसायाच्या दृष्टीने ही मोठी पर्वणी असते. लेह-लद्दाख टुरिझमचाही हा काळ असतो. श्रावणात देशांतर्गत पर्यटन तसेच पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा येथे पावसाळी पर्यटनाचाही हंगाम असतो. यंदा यातील काहीच शक्‍य झाले नाही. परिस्थिती पाहता अंदाजे दिड वर्ष तरी ही स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत. या श्रावणात पर्यटकांना टुरिझमचाही उपवास घडणार आहे. एका टुरिझम कंपनीकडुन वर्षभरात किमान 500 पर्यटक बाहेर जातात. यातुन मिळणारे उत्पन्न यंदा शुन्यावर आले आहे. कोरोना प्रादुर्भाव पाहता लोकांनी घरीच सुरक्षित रहावे म्हणजे पुढील वर्षी तरी पर्यटनाचा आनंद घेता येईल.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola becomes colorless Shravan, tourism sector hit by corona