
Akola News: ओठावर मिसरूढ फुटण्याआधीच हातात बाईकची चावी!
अकोला : अज्ञान मुलांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हाती दिलेली मोटारसायकल जीवघेणी ठरत आहे. बेफिकीर पालकही त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करत नसल्याचे दिसून येते. या मुलांच्या ‘धूम स्टाईल’च्या हौसेपुढे पादचारी नागरिकांच्या जीवालाही धोका पोहोचत आहे. या हौशी मुलांना आवर घालण्यासाठी अकोला शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवून दंडाचा चाबूक उगारला आहे. (Akola News Updates)
अठरा वर्षांखालील मुले गाडी चालविताना सापडल्यास त्यांच्यासह पालकांना हजार रुपये दंड भरावा लागणार तर आहेच, शिवाय अपघात झाल्यास गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात मुलांबरोबर पालकांनाही शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. असे असतानाही अकोल्यात पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत मिसरुढ फुटण्याआधीच मुलांच्या हातात बाईकची चावी सोपविले जात आहे.
त्यामुळे अकोला शहरात शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला मार्फत विशेष मोहीम राबविली जात आहे या मोहिमेंतर्गत मंगळवारी १० अल्पवयीन वाहन चालकांना थांबवून त्यांचे वाहन वाहतूक कार्यालकात जमा करण्यात आले. मोटारवाहन कायदा अन्वये कायदेशीर दंडात्मक कार्यवाही करून एकूण ३५ हजार रुपायंचा दंड शासन जमा करण्यात आला आहे.
काय म्हणतो नियम?
मोटार वाहन कायदा कलम १८० नुसार अल्पवयीन मुलांचे पालक तसेच वाहनांचे मालक यांचेविरुद्ध कारवाई करण्याचा नियम आहे. या गुन्ह्यासाठी तीन महिन्यांचा कारावास किंवा हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
दंडात्मक कारवाई, तरीही कर्कश आवाजाचे फटाके सुरूच
शहरात कर्कश आवाज करणारे फटाके फोडणारे मॉडिफाइड सायलेन्सर लावून फिरत असलेल्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. त्यानंतरही कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून वाहने फिरविली जात आहे. अशा एकूण आठ बुलेट वाहनांवर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मोटर वाहन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई केली. मंगळवारी दिवसभरात वाहतूक शाखेत मार्फत शहरात वाहतूक नियमांची उल्लंघन करणाऱ्या एकूण ४०० वाहनधारकांविरुद्ध मोटार वाहन कायदा अन्वये कायदेशीर कारवाई करून एकूण ६० हजार रुपये दंड शासन जमा करण्यात आला.
नागरिकांना त्यांच्या अल्पवयीन पाल्यांना वाहन चालवण्यासाठी देऊ नये. यापुढे अल्पवयीन वाहन चालक मिळाल्यास त्यांचे पालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा अन्वये कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करून वाहने चालवून वाहतूक पोलिस दलास सहकार्य करावे.
- विलास पाटील, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, अकोला