परंपरा मोडीत काढायची म्हणून लावला अॅन्टी करप्शनचा ट्रॅप

Akola Buldana News: Anti-corruption trap set to break tradition
Akola Buldana News: Anti-corruption trap set to break tradition

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा)  : नगरपालिका प्रशासनामार्फत वारसाहक्काने सफाई कामगार म्हणून नियुक्तीसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या आर्थिक शोषणाची परंपरा मोडीत काढायची म्हणून नाईलाजास्तव अँटी करप्शनचा ट्रॅप लावला. नगराध्यक्ष पतीसोबत कुठल्याही प्रकारचे षडयंत्र रचण्यात आले नाही. लाच प्रकरणात पंचा समक्ष त्यांनी चूक केली.

लाच स्वीकारली म्हणून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. यापुढे न्याय हक्काच्या मागणीसाठी माझा कायदेशीर लढा सुरू राहील, अशी माहिती अँटी करप्शन प्रकरणातील फिर्यादी अ‍ॅड. विजय सूनगत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

अमरावती विभाग लाचलुचपत प्रतिबंधक पथकामार्फत ता. ४ सप्टेंबर रोजी नगराध्यक्ष पती यांना वारस हक्क नियमानुसार सफाई कामगार यांचे ठराव विषय पत्रिकेत मांडून पारित करण्यासाठी ८० हजार रुपये स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर प्रकरणानंतर फिर्यादी यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकी मिळाली. तदनंतर त्यांनी पोलिसात संबंधित धमकी देणाऱ्या विरुद्ध तक्रार नोंदविली.

या पार्श्वभूमीवर भाजप विधी सेवा सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.विजय सूनगत पत्रकारांशी संवाद साधत होते. पुढे बोलताना सदर प्रकरणातील संपूर्ण घडामोडीचा उलगडा त्यांनी केला. ते म्हणाले, गत अनेक वर्षांपासून आमच्या समाजातील अनेक जण नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून सेवा देत आहे.

कामगार सेवानिवृत्त झाल्यानंतर वारसा हक्काच्या नियमानुसार त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरीत समाविष्ट करणे बंधनकारक आहे. यासाठी आतापर्यंतच्या नगराध्यक्ष अथवा नगरसेवकांनी पैशाची मागणी केली नाही. माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, कवीश जिंतुरकर नियमानुसार सफाई कामगारांना कुठलाही त्रास न देता नोकरीत सामावून घेतले. मात्र चार वर्षांपासून वारसाहक्काच्या नियमानुसार कुटुंबातील व्यक्तीस सामावून घेण्यासाठी पैशाची मागणी होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

समाजाने वारसाहक्क प्रमाणे नोकरीसाठी पैसे द्यायचे नाही, असे एका बैठकीत ठरवले. मी भाजप विधी सेलचा तालुका अध्यक्ष असूनही माझ्याकडून माझ्या पत्नीस वारसाहक्क प्रमाणे माझ्या आईच्या जागेवर नोकरीवर घेण्यासाठी ८० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. एकीकडे समाजाने पैसे ना देण्याचा घेतलेला ठराव तर दुसरीकडे स्वपक्षाच्या बॉडीकडूनच होत असलेली पैशाची मागणी या विवंचनेत मी होतो.

नियमानुसार दुसऱ्या महिन्यातच वारसाहक्क प्रमाणे कुटुंबातील व्यक्तीस नोकरीत समावून घेणे आवश्यक असताना चार मिटिंगमध्ये विषयपत्रिकेवर माझ्या पत्नीचा ठराव मांडण्यात आला; मात्र तो पारित झाला नाही. आठ महिने उलटले तरीही ठराव पारित होत नाही. व्यवस्थे पुढे झुकायचे नाही. समाजाच्या ठरावानुसार पैसे द्यायचे नाही. म्हणून परंपरा मोडून काढायचा बेत घेतला व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.

तक्रारीनंतर एसीबीकडून झालेल्या पडताळणी कॉलमध्ये पाच ते सहा नगरसेवकांची नावे असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला असून, नगराध्यक्ष पती डॉ. शिंदे यांच्याशी कुठलाच राजकीय वैर नसल्याचा खुलासा त्यांनी यावेळी पत्रकारांसमोर केला. नगराध्यक्ष पती यांना जामीन मिळाला नसून, मेडिकल ग्राउंडवर त्यांची सुटका झाली असल्याची माहिती पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी दिली. माझा न्यायपालिकेवर विश्वास आहे. यापुढे माझ्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाविरुद्ध न्यायालयात धाव घेण्याचा इशारा अ‍ॅड. विजय सूनगत यांनी यावेळी दिला.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com