नेमका पाऊस पडला तरी किती? आकडेवारीत होतोय हा गोंधळ

पंजाबराव ठाकरे
Monday, 14 September 2020

तालुका स्तरावरून जिल्हा प्रशासनाला पाठविलेला पर्जन्यमानाचा अहवाल आणि शासनाच्या वेबसाईटवर असलेली आकडेवारी यामध्ये अनेकदा तफावत दिसून येत आहे. आकड्यांच्या या गोंधळाचा शेतकऱ्यांना मागील काळात फटका बसलेला असून  यंदाही तालुक्यातील शेतकऱ्याचे आगामी काळात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने वेळीच सजगता दाखविण्याची गरज आहे.शुक्रवारी (ता.११) पावसाची शासकीय आकडेवारी बघितली असता यामध्ये चूक दिसून आली.

संग्रामपूर (जि.बुलडाणा) :  तालुका स्तरावरून जिल्हा प्रशासनाला पाठविलेला पर्जन्यमानाचा अहवाल आणि शासनाच्या वेबसाईटवर असलेली आकडेवारी यामध्ये अनेकदा तफावत दिसून येत आहे. आकड्यांच्या या गोंधळाचा शेतकऱ्यांना मागील काळात फटका बसलेला असून  यंदाही तालुक्यातील शेतकऱ्याचे आगामी काळात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने वेळीच सजगता दाखविण्याची गरज आहे.शुक्रवारी (ता.११) पावसाची शासकीय आकडेवारी बघितली असता यामध्ये चूक दिसून आली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

नेमकी चूक कुणाची हा तपासाचा भाग बनत आहे. प्राप्त माहितीनुसार तालुका स्तरावर महसूल मंडळानुसार पावसाची नोंद दररोज तहसील कार्यालयात घेतली जाते. त्या आकडेवारीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविला जातो. असाच अहवाल शुक्रवारी सकाळी तालुक्यातील चार मंडळांचा पाठविण्यात आला.

त्यामध्ये कवठळ, संग्रामपूर, पतुर्डा, बावनबीर या मंडळांचा समावेश आहे. तहसील स्तरावरून गेलेला अहवाल आणि शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर असलेला अहवाल यातील आकडेवारीमध्ये खूपच तफावत दिसून येत आहे.

भविष्यात यामुळे तालुक्यातील पीक नुकसानीची भरपाई ,पीकविमा अथवा शासनाच्या अन्य योजनापासून शेतकरी वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. कारण शासनाच्या वेबसाईटवर दर्शविलेली आकडेवारी नुसार तालुक्यात १० सप्टेंबरला चारही मंडळातील पावसाची आकडेवारी एक सारखी दिली आहे.

याअगोदर काही वर्षांपूर्वी या तालुक्याची पावसाची जास्तीची आकडेवारी दाखविण्यात आली होती. त्यावेळी शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार होते. मात्र तो मुद्दा पत्रकार संघाच्या वतीने शासनाच्या लक्षात आणून दिल्यावर उशिरा शेतकऱ्यांना न्याय मिळाला होता. ती वेळ पुन्हा येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana News: Confusion in rainfall statistics