अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणे पडला महाग, न्यायालयाने सुनावली दोन नराधमांना फाशी

अरूण जैन 
Friday, 14 August 2020

जिल्ह्यातील चिखली येथील एका नऊ वर्षीय बालिकेला झोपेतून उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोन नराधम युवकांना बुलडाणा न्यायालयाने गुरुवारी (ता. १३) फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश चित्रा हंकारे यांनी हा निकाल दिला.

बुलडाणा  : जिल्ह्यातील चिखली येथील एका नऊ वर्षीय बालिकेला झोपेतून उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोन नराधम युवकांना बुलडाणा न्यायालयाने गुरुवारी (ता. १३) फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश चित्रा हंकारे यांनी हा निकाल दिला.

जिल्हाभरात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणातील प्राप्त माहितीनुसार, चिखली येथील कुटुंबासोबत झोपेत असलेल्या एका नऊ वर्षे बालिकेला २७ एप्रिल २०१९ च्या रात्री विश्वनाथ बोरकर (वय २२) व निखिल गोलाईत (वय २४) या दोन नराधम युवकांनी खुल्या मैदानात झोपेतून उचलून नेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार केला होता.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या प्रकाराबद्दल वाच्यता केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती. सदर बालिकेवरील अत्याचारामुळे तिची प्रकृती बिघडल्याने तिच्यावर सुरुवातीला चिखली, बुलडाणा व त्यानंतर औरंगाबाद येथे उपचार करावे लागले.

या प्रकरणातील पीडित बालिकेच्या वडिलांच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी दोन्ही नराधमांना अटक करून त्यांची चौकशी सुरू केली होती. यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात पीडितेसह इतर १४ साक्षी नोंदविण्यात आल्या.

सर्व साक्षीपुरावे तपासल्यानंतर सबळ पुरावा नसल्याने व बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने दोघा संशयित आरोपींना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे ॲड. वसंत भटकर व सोनाली सावजी यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. या घटनेनंतर विविध राजकीय पक्ष व संघटनांनी निषेध करून दोन्ही नराधमांना कठोर शिक्षा करण्याची व फाशीची शिक्षा देण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.

या शिक्षेमुळे पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana News Minor girl had to be tortured, court sentenced two men to death