दुकानांचे शटर आज उघडणार, जनता संचारबंदीत तीन दिवस सहकार्य करणाऱ्यांचे आभार

अरूण जैन 
Monday, 21 September 2020

कोरोनाची चैन तोडण्यासाठी गेले तीन दिवस सर्व व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवल्याबद्दल बुलडाणा चेंबर ऑफ कॉमर्सने सर्व व्यापारी यांचे आभार मानले. सोमवार, ता.२१ पासून सर्व प्रतिष्ठाने सकाळी नऊ ते पाच या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांनी कोरोना प्रतिबंधासाठी घालून दिलेले सर्व नियम पाळण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

बुलडाणा  : कोरोनाची चैन तोडण्यासाठी गेले तीन दिवस सर्व व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवल्याबद्दल बुलडाणा चेंबर ऑफ कॉमर्सने सर्व व्यापारी यांचे आभार मानले. सोमवार, ता.२१ पासून सर्व प्रतिष्ठाने सकाळी नऊ ते पाच या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांनी कोरोना प्रतिबंधासाठी घालून दिलेले सर्व नियम पाळण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार संजय गायकवाड यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा अध्यादेश काढून बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार गेले तीन दिवस सर्व व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून व्यापारी व सर्व नागरिकांचे सतत हाल होत आहेत. व्यापाऱ्यांचे जागेचे भाडे, बँकांचे थकीत हप्ते, व्याज, कामगारांचा पगार इत्यादी खर्चाचे नियोजन कोलमडले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यातही पुढे येऊ घातलेल्या सणासुदीचा विचार करता आतापासूनच सर्व दुकानदारांना नियोजन करणे अनिवार्य झाले आहे. अन्यथा परिस्थिती गंभीर होऊ शकते, हे लक्षात घेऊन बुलडाणा चेंबर ऑफ कॉमर्सने बाजारपेठेतील दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही सर्व प्रतिष्ठाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनांच्या चर्चेतून पुढे आला आहे.

हे सर्व करीत असताना आपली सामाजिक जबाबदारी म्हणून प्रशासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन अपेक्षित आहे. सर्वांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग, गर्दी न होऊ देणे या नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. बुलडाणा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष विजय बाफना व कार्यकारिणी सदस्यांनी ही बैठक घेऊन उपरोक्त निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळासाठी व्यापाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana News: Shutters of shops to open today, thanks to those who cooperated for three days