Akola : पूल ओलांडताना दोघे गेले वाहून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 दोघे गेले वाहून

Akola : पूल ओलांडताना दोघे गेले वाहून

वणी वारुळा : गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहे. त्यातच मंगळवारी पहाटे अकोट तालुक्यातील तांदुळवाडी येथील आजोबा आणि नातू मोहाळी नदीचा पूल ओलांडताना वाहून गेले. यातील आजोबाचा मृत्यूदेह सापडला असून, बचाव पथकांकडून नातवाचा शोध घेतला जात आहे.

अकोट तालुक्यातील तांदुळवाडी येथील प्रभाकर प्रल्हाद लावणे (वय ६२) हे त्यांच्या नातू आदित्य विनोद लावणे (वय ११) यांच्यासोबत सोनबर्डी येथे गेले होते. दोघेही मंगळवारी पहाटे म्हैस घेवून सोनबर्डी गावात गेले होते. परतीच्या मार्गावर असताना मोहाळी नदीवरील पूल ओलांडत होते. गेले दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोहाळी नदी दुथडी वाहत होती. पुलावरूनही पाणी वाहत होते. त्यानंतरही आजोबा आणि नातावाने पुलावरून जाण्याचे धाडक केले. ते त्यांच्या चांगलेच अंगलट आले.

प्रभाकर यांचा नातू आदित्य हा नदीच्या प्रवाहात वाहून जात होता. त्याला वाचवण्यासाठी आजोबांनी प्रयत्न केले. मात्र, पाण्याच्या प्रवाह अधिक वेगाने असल्याने आजोबा देखील नदीच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेची माहिती तांदूळवाडी गावकऱ्यांना मिळताच त्यांनी नदीच्या स्थळी भेट दिली. दोघांनाही शोधण्यास सुरुवात केली. या दरम्यान प्रभाकर लावणे यांचा मृतदेह हाती लागला आहे. तर नातू आदित्य अजूनही बेपत्ता आहे त्याचा शोध सुरू आहे.

युवक धावले मदतीला

दोघांना बुडत असल्याचे पाहून नदीकाठच्या शेतात असणाऱ्या युवकांनी मदतीसाठी धाव घेत पाण्यात उड्या घेतल्या. प्रभाकर लावणे यांना बाहेर काढले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. प्रभाकर लावणे यांचे केवळ प्रेतच हाती आले. त्याच युवकांनी आदित्यला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केले. परंतु आदित्यचा ठावठीकाणा लागला नाही. आजोबांना पाण्यातून बाहेर काढून अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

प्रशासनाकडून शोध सुरू

अकोट तहसीलदार नीलेश मडके, आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख, गटविकास अधिकारी शिंदे, मंडळ अधिकारी प्रशांत सहारे, तलाठी घुगे, खेडकर, खारोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोपटखेड येथील एकलव्य बचाव पथकाचे प्रमुख पांडुरंग तायडे व माँ भवानी क्रीडा मंडळ पणज आणि संत गाडगेबाबा बचाव पथक पिंजर यांच्याकडून आदित्यचा शोध सुरू आहे.

तंबाखूच्या डब्बीने झाला घोळ

मोहाळी नदीच्या पुलावरून जात असताना आजोबा प्रभाकर लावणे यांची तंबाखूची डब्बी पाण्यात पडली. नातवाची चप्पलसुद्धा पाण्यात पडली. ती काढत असताना नातू पाण्यात वाहत जाताना दिसला. त्यामुळे आजोबांनी सुद्धा पाण्यात उडी घेतली. नातवाला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. नातवाला पकडण्यात त्यांना यश आले होते; परंतु नियतीचा खेळच निराळा. नातवाला बाहेर काढत असताना नातू व आजोबा पाण्याच्या वेगात वाहून गेले.

नागरिकांचा प्रशासनावर रोष

या दुर्घटनेला नागरिकांनी प्रशासनाला जबाबदार धरले आहे. तांदूळवाडी सोनबर्डी नदीच्या परिसरात थोडा जरी पाऊस पडला तरी देखील हा पूल पाण्याखाली जातो. याचे कारण म्हणजे या पुलाची उंचीच खूप कमी आहे. ही स्थिती असल्यामुळे प्रशासनाने पाऊस पडल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करायला हवा हाेता असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र सोनबर्डी आणि तांदूळवाडी वाहतुकीसाठी हाच एक पर्याय मार्ग असल्याने अनेकदा नागरिक आणि विद्यार्थ्यांना यामधून जीवघेणा प्रवास करावा लागतो. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळेच दोघे वाहून गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, सोनबर्डी आणि तांदूळवाडी या रस्त्याच्या कामाला मंजुरी देखील मिळाली असून, अद्यापही प्रशासनाने काम सुरू केले नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :AkolarainRiverAkola Crime