
अकोला : महानगरातील रस्त्यावर बेशिस्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रिक्षाचालक रस्त्यावर अचानक थांबून प्रवाशांची वाहतूक करत आहेत. शहरात ऑटो रिक्षांची संख्या वाढल्याने प्रवासी घेण्यासाठी रिक्षाचालकांमध्ये स्पर्धा लागली आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत असून अपघातही होत आहेत. त्यामुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत ४३२ वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यावेळी संबंधितांकडून ६५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.
महानगरात रिक्षाचालकांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहरातील चौका-चौकात वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. यामुळे इतर वाहनचालकांना व प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. तसेच शहरात अवैध प्रवासी वाहतूक सुद्धा वाढलेली दिसून येत आहे.
त्या अनुषंगाने शहरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर आळा बसावा यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत १६ सप्टेंबर रोजी शहर वाहतूक नियंत्रण शाखा येथील पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे मार्फत विशेष मोहीम राबवून अवैध प्रवासी वाहतूक करत असलेल्या एकूण २२ ऑटोरिक्षा चालक तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारक विरुद्ध कलम ६६/१९२ मोटर वाहन कायदानुसार कारवाई करण्यात आली. याव्यतिरिक्त दिवसभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४३२ वाहनधारकांवर मोटर वाहन कायदा अन्वये कारवाई करून ६५ हजार ५०० रुपयांचा दंड शासन जमा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना कोंबणाऱ्या वाहनांवर कारवाई
अकोला महानगरातील शाळा सुरू असून त्यामध्ये विद्यार्थ्यांची ने-आन करण्यासाठी अनेक पालकांनी ऑटोची सेवा सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील विविध चौकांसह विविध भागातील शाळांमध्ये पहाटेच्या वेळी विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येते. या वाहतुकीदरम्यान काही ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या ऑटो चालकांवर शहर वाहतूक शाखेमार्फत १७ सप्टेंबर रोजी कारवाई करण्यात आली.
यावेळी शहर वाहतुक शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यांनी स्थानिक अशोक वाटिकेसह अग्रसेन चौक, नेहरू पार्क चौक, सिंधी कॅम्प चौक आणि इतर भागांमधून येणाऱ्या ४५ ऑटो चालकांना थांबवून त्यांच्यावर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई केली आणि दंड ठोठावला.
बुलेट चालकांवर कारवाई
शहरात फटाके फोडणाऱ्या, कर्कश्य आवाज करणाऱ्या एकूण १५ बुलेट धारकांवर वाहतूक पोलिसांनी कायदेशीर दंडात्मक कारवाई केली. सदर प्रकारची कारवाई भविष्यातही अशीच सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक विरुद्ध कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करून वाहने चालवून व प्रवासी वाहतूक करून पोलीस दलात सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.