
अनधिकृत होर्डिंग्जवर अकोला मनपाची कारवाई
अकोला : शहरातील मुख्य रस्ते व चौकात लावण्यात आलेल्या अनाधिकृत जाहिरात होर्डिंग्ज व फलकांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने निष्कासनाची कारवाई केली. आतापर्यंत नावालाच असलेला अतिक्रमण विभाग प्रशासक नियुक्तीनंतर प्रथमच कारवाई कारवाईसाठी रस्त्यावर फिरताना दिसून आला.
मनपा आयुक्त कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिका मुख्य बाजार पेठ येथील सिटी कोतवाली ते बस स्थानक व पुढे टॉवर चौकापर्यंतचे तसेच खुले नाट्य गृह ते फतेह अली चौकापर्यंतचे अनाधिकृत जाहिराती होर्डिंग्जवर मनपा अतिक्रमण विभागाव्दारे निष्कासनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई सहा.आयुक्त जगदीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात झाली. कारवाईत अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, बाजार विभागाचे गौरव श्रीवास यांचेसह मनपा अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
रस्त्यावरील अतिक्रमणाचे काय?
अतिक्रमण विभागाने शहरातील अनाधिकृत जाहिरात होर्डिंग्जवर कारवाई सुरू केली. मात्र, त्याच वेळी शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा होईल, अशी वाहने उभी केली जातात. हातगाडी लावून व्यवसाय केला जातो. विशेष म्हणजे, हे सर्व महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयापुढेच सुरू असते. अशा अतिक्रमणावर कोण कारवाई करेल, अशा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
परवानगी न घेतल्यास होणार कारवाई
मनपाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय मनपा क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे जाहीरात फलके किंवा होर्डिंग्ज लावण्यात आल्यास संबंधितांवर मनपा प्रशासनाव्दारे दंडात्मक कारवाई केली जाईल. अनाधिकृत फलके व होर्डिंग्जवर निष्कासनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपाच्या अतिक्रमण विभागाने दिला आहे.
Web Title: Akola Corporation Action On Unauthorized Hoarding
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..