Akola: मनपा मूळ हद्दीत दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Supply

अकोला : मनपा मूळ हद्दीत दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू

अकोला : शहरातील दोन नव्याने बांधण्यात आलेल्या जलकुंभासह नऊ जलकुंभातून महानगरपालिकेच्या मुळ हद्दीत दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. उर्वरित जलकुंभातील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हद्दवाढीत मात्र अद्यापही पाच दिवसा आड पाणीपुरवठा सुरू आहे.

महापालिकेची हद्दवाढ होण्यापूर्वी शहरात १४ जलकुंभ होते. याच १४ जलकुंभाच्या माध्यमातून दोन कोटी ४४ लाख ५० हजार लिटर साठवण क्षमता निर्माण झाली होती. दरडोई होणारा पाणीपुरवठा लक्षात घेता, एवढ्या साठवण क्षमतेतून दोन दिवसाआड पाणी पुरवठा शक्य नसल्याने अमृत योजनेतून सात जलकुंभ बांधण्यात आले. या सर्व जलकुंभाचे बांधकाम व चाचणी सुरू झाल्याने आता साठवण क्षमता तीन कोटी ७२ लाख लिटर झाली आहे. त्यामुळेच आता शहराच्या मुळ हद्दीतील जुलकुंभांवरून दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

या जलकुंभाच्या परिसरात अंमलबजावणी

तोष्णीवाल ले-आऊट, महाजनी प्लॉट (दोन जलकुंभ), आदर्श कॉलनी (दोन जलकुंभ), नेहरु पार्क चौक, श्रद्धा नगर, केशव नगर, न्यायालया समोरील मनपा शाळा या जलकुंभातून दोन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. उर्वरित जलकुंभातून चाचणी सुरू असल्याने व अनेक तांत्रिक अडचणी त्यात समोर झाल्याने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणे अद्याप शक्य झाले नाही.

हद्दवाढीत नवीन जलवाहिन्यांची प्रतीक्षा

अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यात मनपाच्या मूळ हद्दीतच जलवाहिनी टाकण्याची कामे करण्यात आली. त्यामुळे हद्दवाढीत आता अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून नवीन जलवाहिन्या टाकण्यात येतील. त्यानंतरच हद्दवाढीतील क्षेत्रात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होईल. तोपर्यंत पाच दिवसा आड पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

loading image
go to top