
मौज मस्तीसाठी करीत होते घरफोडी
अकोला : शहर व जिल्ह्यात घरफोडीच्या गुन्ह्यांची मालिकाच सुरू असतानाही चोरटे हाताला लागत नसल्याने संपूर्ण पोलिस यंत्रणा त्रस्त झाली होती. अशात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यांचा मागोवा घेताना अकोला शहरातील न्यू राधाकिसन प्लॉट परसिरातील रहिवासी तिघांना ताब्यात घेतल्यानंतर मौज मस्तीसाठी या घरफोड्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
अकोला जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून विविध पोलिस स्टेशनच्या हद्दीत घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल झाले. त्यातील चोरटे पोलिसांच्या हातात लागत नसल्याने संपूर्ण यंत्रणा हतबल झाली होती. अशात पोलिस तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. या पथकाने गुन्ह्यातील तपासाचा मागोवा घेत तीन ताब्यात घेतले. त्यात आशिष इश्वर लोडाया (वय २५, रा. केतकी अपार्टमेंट, न्यू राधाकिशन प्लॉट, अकोला.), पुर्वेश राजेश शाह (वय २८, रा. फ्लॅट नं. ७, श्रीनाथ अपार्टमेंट, न्यू राधाकिशन प्लॉट, अकोला.) आणि शिवम विरेंद्र ठाकुर (वय २४, रा. केतकी अपार्टमेंट, राधाकिशन प्लॉट, अकोला.) या तरुणांचा समावेश आहे. पोलिशी खाक्या दाखवित केलेल्या चौकशीत या तिघांनीही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १६३.४ ग्रॅम सोने ज्याची किंमत सहा लाख ४६ हजार ३७० रुपये, एक किलो ३८० ग्रॅम चांदी, ज्याची किंमत ५६ हजार ३७० रुपये, आणि रोख रक्कम २९ हजार रुपये असा एकूण सात लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, अब्दुल माजीद, स्वप्निल खेडकर, अक्षय बोबडे यांच्या पथकाने केली.
बेरोजगार तरूण वाममार्गाला
न्यू राधाकिसन प्लॉटमधून ताब्यात घेतलेल्या आशिष, पुर्वेश आणि शिवम हे तिन्ही आरोपी बेरोजगार आहेत. हाताला कामधंदा नसल्याने तिघांनी एकत्र येत बंद घरांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. घरी कुणी नसल्याची संधी साधून हात साफ करायला लागले. त्यातून मिळणाऱ्या पैशावर त्यांनी मौज मस्ती करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांना याची सवयच लागली. अकोला जिल्ह्यातील जवळपास १३ पोलिस स्टेशन हद्दीत घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. गुन्हा करून फरार झाल्यानंतरही ते पोलिसांच्या हातात लागत नव्हते. मात्र, वाममार्गाला लागल्यामुळे अखेर ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले आणि घरफोडीच्या मालिकेतील गुन्हेगारांचा भंडफोड झाला.
Web Title: Akola Crime Update 13 Burglary Cases Statement Of Robbers We Having Fun
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..