Akola : विवेकी समाजासाठी दाभोळकराचे जीवन समर्पित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. नरेंद्र दाभोलकर

Akola : विवेकी समाजासाठी दाभोळकराचे जीवन समर्पित

वाशीम : भारतातील थोर संत सुधारकांचा विवेकी वारसा समाजात रूजवून अंधश्रद्धा दूर करण्यासाठी उभी हयात समाजासाठी समर्पित करणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा एक नोव्हेंबर रोजी जन्मदिन वाशीम येथे विवेक जागर दिन व चमत्कार सादरीकरण कार्यशाळेने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ. रामकृष्ण कालापाड हे होते.

महाराष्ट्रामध्ये विविध चळवळी सुरू असताना समाजातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ज्याकडे आतापर्यंत कोणाचाही लक्ष गेलं नव्हतं अशा अंधश्रद्धा निर्मूलन या विषयाकडे नरेंद्र दाभोळकरांनी राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष वळवलं.

जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात यावा यासाठी दाभोळकरांना सतत संघर्ष करावा लागला. विवेकी समाजासाठी दाभोळकरांनी त्यांचे जीवन समर्पित केले, असे डॉ. रामकृष्ण कालापाड यावेळी म्हणाले.

हा कार्यक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखेच्या वतीने संपन्न झाला. प्रशिक्षक म्हणून महाअनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष पी. एस. खंदारे हे होते. यावेळी प्रल्हाद पोळकर, प्रा. महेश देवळे, शाहीर शेषरावजी मेश्राम, दत्तराव वानखेडे, ॲड. देवेंद्र सोनवणे, दत्ता महाले, संदीप वैद्य, विजय शिंदे, अजय पठाडे, जितेश कांबळे हे उपस्थित होते.

खंदारे यांनी विविध चमत्कार सादरीकरण करून त्या मागील विज्ञान समजावून सांगितले व उपस्थितांच्या शंकांची उत्तरे दिलीत. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. महेश देवळे यांनी केले.