
अकोला : शहराच्या विकासासाठी केंद्राकडून मिळणार निधी
अकोला : राज्यातील महाविकास आघाडीने शहराच्या विकाससाठी हात आखडता घेतल्याने आता केंद्र सरकारकडून विकास कामांसाठी निधी मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय मार्ग निधी (सीआरएफ) मधून कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या प्रस्तावांबाबत कोणता निर्णय घेतात याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
अकोला शहर हे मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. विशेषतः रस्ते विकासाबाबत विदर्भातील सर्वात मागसलेली महानगरपालिका अकोला आहे. त्यात राज्यातील महाविकास आघाडीकडून भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघात निधी देताना आखडता हात घेतला आहे. मनपाच्या निधीतून रस्ते विकास करणे अशक्य आहे. ते बघता भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांनी केंद्रीय मार्ग निधीतून अकोला शहरासाठी कामे प्रस्तावित केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रस्ताव पाठविला असून, त्यात मोर्णा नदीवरील पूल व बाळापूर नाकापर्यंतच्या रस्त्यासाठी निधीची मागणी केली आहे.
काय आहे प्रस्तावात?
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मोर्णा नदीवरील जुना हिंगणा गाव ते गणेश घाट हिंगणा रोड येथे पुलाचे बांधकाम करण्यासाठी ३५ कोटीचा निधी तर जुने शहरातील असदगढ किल्ला ते बाळापूर नाक्यापर्यंतच्या रस्ता बांधकामासाठी २५ कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर केंद्रीय मार्ग निधीतून अकोला शहरासाठी कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार हिंगणा रोडवरील मोर्णा नदीवरील पुल आणि बाळापूर नाक्यापर्यंतचा रस्त्याच्या कामाचे प्रस्ताव देण्यात आले असून, लवकरच ही निधी मंजूर होईल.
- आमदार गोवर्धन शर्मा, अकोला पश्चिम.
Web Title: Akola Development Central Roads Fund Approved Gadkari Decision
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..