esakal | अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीची काँग्रेसवर कुरघोडी
sakal

बोलून बातमी शोधा

CONGRESS NCP

काँग्रेसमधूनच बाहेर पडलेल्या नेत्यांवर स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अकोला जिल्ह्यात काँग्रेसवर कुरघोडी करण्यास सुरवात केली आहे. अशा परिस्थितीतही एक-दोन नेते वगळले तर काँग्रेसच्या गोटातील चुप्पीने कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकले आहे.

अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीची काँग्रेसवर कुरघोडी

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला : राजकारणात 80 च्या दशकापर्यंत एकहाती वर्चस्व गाजविणारा काँग्रेस पक्ष आज अकोला जिल्ह्यात अस्तित्वासाठी धडपडतोय. तर दुसरीकडे काँग्रेसमधूनच बाहेर पडलेल्या नेत्यांवर स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अकोला जिल्ह्यात काँग्रेसवर कुरघोडी करण्यास सुरवात केली आहे. अशा परिस्थितीतही एक-दोन नेते वगळले तर काँग्रेसच्या गोटातील चुप्पीने कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकले आहे.


एकेकाळी अकोला जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा मतदारसंघासह स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचा एकहाती अमल होता. सन 1982 च्या काळात अकोला जिल्ह्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा अकोला जिल्ह्यातील राजकारणात प्रवेश झाला आणि काँग्रेसच्या सत्तेला उतरती कळा लागली. पुढे शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन केली. त्यासोबतच अकोला जिल्ह्यातही काँग्रेस दोन गटात विभागल्या गेली. दोन्ही काँग्रेस या जिल्ह्यात आपले वर्चस्व पुन्हा स्थापन करण्यासाठी संघर्ष करीत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस कधी पुढे निघून गेली याची कल्पनाही काँग्रेस नेत्यांना आली नाही. सहकार क्षेत्रात काँग्रेसला मागे टाक राष्ट्रवादीने जिल्ह्यात वर्चस्व निर्माण केले.

सहकार क्षेत्रात काँग्रेस नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागे फरपटत जाण्याची वेळ आली. हळूहळू जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवरही काँग्रेसचे जिल्ह्यातील वर्चस्व कमी होऊ लागले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात हळूहळू त्यांचे बळ वाढविण्यास सुरवात केली. विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला यश आले नसले तरी जिल्ह्यातून विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिनिधी पाठवून एकप्रकारे काँग्रेसवर जिल्ह्यात कुरघोडीच केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल मिटकरी यांना जिल्ह्यातून विधान परिषदेवर पाठविल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रस्थापित नेते त्यांना किती स्वीकारतात आणि या नेत्यांसोबत मिटकरी कसे जुळवून घेतात यावरही भविष्यात राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यातील जिल्ह्यातील संबंध अवलंबून राहणार आहे.


कोरोनात काँग्रेस नेत्यांचे ‘वर्क फॉर्म होम’
एकीकडे युवक काँग्रेसने संपूर्ण राज्यभर कोरोना विषाणूच्या काळात लोकांच्या मदतीसाठी प्रयत्न केले. सोशल माध्यमातून जनजागृतीचे प्रयत्न केले. त्याला अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीतील बोटावर मोजण्याइतपत पदाधिकाऱ्यांची साथ लाभली. जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्षांसह कुणीही जिल्ह्यात लोकांच्या मदतीसाठी पुढे येताना दिसेल नाही. मनपातील विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण कंटेन्मेंट झोनमध्ये अडकले होते. नगरसेवक डॉ. झिशान हुसेन यांनी त्यांच्या परीने लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे कोरोना विषाणूच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्‍यांनी अकोला शहरासह ग्रामीण भागातही लोकांना मदतीचा हात देवून येथेही काँग्रेसवर कुरघोडी केल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक आघाडीचे पदाधिकारी जावेद जकेरिया यांनी तर कोरोनामुळे मृत झालेल्या नागरिकांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारीही स्वीकारली.


कामगारांना मदतीसाठीच पडले बाहेर
राष्ट्रीय स्तरावरून काँग्रेस नेत्यांनी आदेश दिल्यानंतर अकोला जिल्ह्यातून जाणाऱ्या कामगारांना राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवस मदत करण्यासाठीच काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी व त्यांचे सहकारी पुढे आले. त्यानंतर पुन्हा काँग्रेसच्या गोटात शांतता दिसून आली.


काँग्रेसकडे कधीच ‘मोठा भाऊ’ म्हणून बघितले नाही
मुळात राष्ट्रवादीत प्राबल्य असलेल्या सहकार क्षेतातील प्रस्थापित नेत्यांनी काँग्रेसकडे कधीच ‘मोठा भाऊ’ म्हणून बघितले नाही. आपल्या मर्जीतील उमेदवार दिला तर ठीक नाही तर सहकार नेत्यांनी कायम काँग्रेसच्या उमेदवारवाराला पाडण्यातच धन्यता मानली आहे. राज्यात आणि केंद्रात आघाडी असली तरी जिल्ह्यात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कायम कुरघोडीचे राजकारण राहिले आहे, आणि तसेच राष्ट्रवादीच्या एका गटातील नेत्यांचे भाजपमधील वरिष्ठ नेत्या सोबत असलेले ‘मधुर संबंध’ या मुळे जिल्ह्यात नेहमी काँग्रेसचे नुकसान झाले असल्याचे अनेक निष्ठावान कार्यकर्ते बोलून दाखवतात.