
Akola : तोतया सर्वेक्षण अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
यवतमाळ : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत दोन महिन्यांपूर्वी थाटण्यात आलेले सर्वोच्च न्यायालय समिती डेक्स समिती कार्यालयासह सर्वेक्षण अधिकारी बोगस निघाला. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी (ता. आठ) यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून तोतयाविरुद्घ विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विजय राजेंद्र रणसिंग (वय ३२, रा. येरणाळा, कळंब, ह.मु. माहूर जि. नांदेड) असे तोतया व्यक्तीचे नाव आहे. तो विजय पटवर्धन या नावाने वावरत होता.
जिल्हाधिकारी कार्यालयात जागा मिळविण्यासाठी त्याने बनावट दस्तऐवज सादर केले. तसेच शासकीय जागेचा वापर करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली. त्याने स्वतःला सर्वोच्च न्यायालयाच्या समितीअंतर्गत नागपूर व औरंगाबाद खंडपीठ यासाठी काम करीत असल्याची बतावणी केली. सदर तरुण तोतया आहे,
यावर कुणालाही संशय आला नाही. विजय रणसिंग हा विजय पटवर्धन नावाने वावरत होता. त्याने नागपूर येथील आदर्श विद्या मंदिरमध्ये २० पदांसाठी भरती परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षा केंद्राला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी कोतवाली पोलिसांकडे केली. या अर्जावर पोलिसांना संशय आला. त्यावरून पोलिसांनी चौकशी सुरू केली.
त्यात पटवर्धन हा तोतया असल्याचे पुढे आले. त्या अर्जामुळे तोतया सर्वेक्षण अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. कोतवाली पोलिसांनी घेतलेल्या झडतीत बनावट शिक्के, कागदपत्रे, लेटरपॅड जप्त करण्यात आले.
याप्रकरणी अप्पर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यातर्फे जिल्हा नाझर वासुदेव वाडेकर यांनी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून विविध कलमान्वये विजय रणसिंग (विजय पटवर्धन) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.