Akola : कपाशीवर ‘दहिया’ रोगाचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola

Akola : कपाशीवर ‘दहिया’ रोगाचा हल्ला

अकोला : अकोल्यासह वाशीम, बुलढाणा जिल्ह्यात कपाशीवर दहिया रोगाने हल्ला चढवला आहे. त्यामुळे परिसरातील कापूस उत्पादन धोक्यात आले असून, तत्काळ उपायोजना करण्याचे शास्त्रज्ञांनी कापूस उत्पादकांना आवाहन केले आहे.

मागील महिन्यामध्ये जोरदार परतीच्या पावसानंतर आता कपाशीच्या पानांचा रंग तांबडा दिसून येत असून, ती पाने सुकून पानगळ होत आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने खोलगट तसेच पाणी धरून घेणाऱ्या जमिनीवरील कपाशीची वाढ खुंटली होती. पाण्याचा योग्य निचरा झाल्यानंतर स्थिती सुधारत असताना अचानक कपाशीची पाने पिवळी पडून हळूहळू पानांचा रंग तांबडा होत आहे. पाने सुकून गळून पडत आहेत. काही ठिकाणी पानाचा कोकडा होत असल्याने त्याचा परिणाम खोडावर होऊन मालधारणा कमी होत आहे. याबाबत कापूस उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, विविध ठिकाणांहून कृषी विभागाकडे तशा तक्रारी नोंदविण्यात आल्या. त्यामुळे ‘डॉ.पंदेकृवि’च्या विविध चमुंनी अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व हा ‘दहिया’ रोग असल्याचे स्पष्ट केले आहे.

रस शोषण किडींचाही प्रादूर्भाव

पाहणी दरम्यान काही ठिकाणी रस शोषण करणाऱ्या किडींचाही प्रादूर्भाव दिसून आला. त्यामध्ये मावा व तुडतुडे तसेच काही प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसून आला आहे. या किडींच्या व्यवस्थापनासाठी थायोमीथाझाम १२.६० टक्के + लॅब्डासायहॅलोथ्रीन ९.५० टकक्के ४ मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये किंवा इमामेक्टीन बेझोएट''१.५ टक्के + प्रोफेनाफॉस ३५ टक्के डब्ल्यूडीजी १४ मिली, इंडोक्झाकार्ब १४.५ टक्के + ॲसीटामिप्रीड ७.७ टक्के प्रवाही यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

या शास्त्रज्ञांनी केली पाहणी

अकोला, वाशीम व बुलडाणा जिल्ह्यात विविध शास्त्रज्ज्ञांची टिम करून पाहणी करण्यात आली. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात डॉ. डी.बी. उंदिरवाडे (संचालक, विस्तार शिक्षण), डॉ. जायभाये (वरिष्ठ शास्त्रज्ञ बुलडाणा), दर्यापूर, दहिहांडा परिसरात डॉ. दरावर्ते, डॉ. ब्राम्हणकर व तेल्हारा तालुक्यामध्ये कृषी अधिकारी सुशांत शिंदे, डॉ. भलकारे, डॉ. इंगळे व कृषी विभागाचे पर्यंवेक्षक माळी, कृषी सहाय्यक सरनाईक, वाशीम जिल्ह्यात डॉ. सातपुते, डॉ. ब्राम्हणकर व डॉ. सदावर्ते यांनी पाहणी केली. या सर्व शास्त्रज्ञांना सर्वाधिक ठिकाणी दहिया रोगाचा प्रादूर्भाव आढळून आला असून, तेल्हारा तालुक्यातील सावरा या गावी काही प्रामाणात लाल्या रोगाचा प्रादूर्भाव सुद्धा आढळून आला आहे.

अशी करा उपाययोजना

कपाशीवरिल दहिया रोगाचे व्यवस्थापन करताना बुरशीनाशक म्हणून अझोक्सोस्ट्रोबीन १८.२ टक्के डब्ल्यू अधिक डायफेनोकोनाझोल ११.४ टक्के डब्ल्यू/(एससी) १ मिली किंवा क्रेसाक्झीम मिथाईल ४४.३ टक्के (एससी) १ मिली प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. व्यवस्थापनाची खर्चीक बाब लक्षात घेऊन ज्या शेतकऱ्यांची पहिली वेचणी झाली असून, उर्वरित वेचणी बाकी असतील, जानेवारीपर्यंत कापूस निघण्याची स्थिती असेल, त्यांनीच या उपाययोजना कराव्या, असा सल्ला डॉ.पंदेकृवि अकोलाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनंजय उंदिरवाडे यांनी दिला आहे.