esakal | शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीचे पाईक व्हावे : कुलगुरू डॉ. भाले
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीचे पाईक व्हावे : कुलगुरू डॉ. भाले

शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीचे पाईक व्हावे : कुलगुरू डॉ. भाले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : शेतकऱ्यांनी विद्यापीठातील कालसुसंगत व उपलब्ध संसाधनांवर आधारित आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांच्या सोयीनुसार वापर करावा व खऱ्या अर्थाने ‘विकेल ते पिकेल’ या उक्तीवर आधारित व्यावसायीक शेतीचे पाईक व्हावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी मंगळवारी (ता.१२) विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर आयोजित शिवारफेरीदरम्यान उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करताना केले.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाकडून प्राप्त सूचनानुसार एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी तथा प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्याला सोयीचे होण्याचे हेतूने यंदा विदर्भातील विविध जिल्ह्यांसाठी विद्यापीठाद्वारे नियोजित कृषी विज्ञान केंद्र व कृषी संशोधन केंद्राचे प्रक्षेत्रावर शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. १२ ऑक्टोबर रोजी अकोला, अमरावती व वाशीम जिल्ह्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मुख्यालयी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा: महाविद्यालये सुरू होण्याची तारीख ठरली, असे असतील नियम

शेतकरी सदन येथे सकाळी दहा वाजता शिवार फेरीचे उद्‍घाटन संपन्न झाले. याप्रसंगी सर्वप्रथम नोंदणी करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील आदिवासी शेतकरी बांधवांनी प्रथम बसमध्ये प्रवास करीत शिवार फेरीला प्रारंभ केला. या बसला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, मोरेश्वर वानखेडे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

विद्यापीठाच्या या प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांच्या भेटी

शिवार फेरीसाठी मंगळवारी (ता.१२) ६८० हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करीत सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पीक कापणी पश्चात कृषी अभियांत्रिकी, कापूस संशोधन, ज्वारी संशोधन, तेलबिया संशोधन, कडधान्य संशोधन, भाजीपाला व मिरची संशोधन, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र, नागार्जून शेती विभाग तसेच कोरडवाहू शेती प्रकल्प, अखिल भारतीय समन्वित फळे संशोधन प्रकल्प आदी ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी विद्यापीठ निर्माण पीक वाण, कृषी यंत्रे-अवजारे यासह पीक लागवडीच्या विविध पद्धतींचे प्रत्यक्ष अवलोकन करीत शास्त्रज्ञासोबत चर्चा करून शंका समाधान केले.

ही दालने ठरली शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू

विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन केंद्र, मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्र, कृषी रसायनशास्त्र विभाग, वनस्पती रोगशास्त्र विभाग, येथील उत्पादित पीक वाणाचे, कृषी निविष्ठाचे दालन शेतकऱ्यांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. या ठिकाणी शेतकऱ्यांकरिता हरभरा, करडई, गहू, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य, जैविक बुरशीनाशके व खते, उती संवर्धित रोपे, विद्यापीठ प्रकाशने इत्यादी सह विविध पिकांचे, भाजीपाला, फळ पिके रोपे, वाण विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले होते.

loading image
go to top