सोयाबीनच्‍या पीक विम्यासाठी शेतकरी अजूनही ताटकळत, दुसऱ्या वर्षीच्या हंगामातील पेरणी सुद्धा आटोपली 

अनुप ताले 
Tuesday, 7 July 2020

दुसऱ्या वर्षीच्या खरिपातील सोयाबीन पेरणी सुद्धा आता आटोपली आहे. मात्र अजूनही जिल्ह्यातील शेकडो शेतकरी खरीप २०१९ मधील सोयाबीन पिकाच्या विम्यासाठीच ताटकळत असून, त्यांना अजून किती दिवस हक्काच्या लाभासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे, याबाबत कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाकडूनही निश्‍चित उत्तर दिले जात नाही.

अकोला  ः दुसऱ्या वर्षीच्या खरिपातील सोयाबीन पेरणी सुद्धा आता आटोपली आहे. मात्र अजूनही जिल्ह्यातील शेकडो शेतकरी खरीप २०१९ मधील सोयाबीन पिकाच्या विम्यासाठीच ताटकळत असून, त्यांना अजून किती दिवस हक्काच्या लाभासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे, याबाबत कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाकडूनही निश्‍चित उत्तर दिले जात नाही.

योग्य वेळी व नुकसानाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने, योजनेचा हेतू साध्य होताना दिसत नाही. पीक विम्याची रक्कम मिळविण्यासाठी दरवर्षी शेतकऱ्यांना कृषी विभाग, जिल्हा प्रशासन विभाग व विमा कंपनीच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. २०१९-२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे आधिच जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता आणि आता कोरोना प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले असून, शेतमाल विक्री सुद्धा करणे कठीण झाल्याने, आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा स्थितीत पीक विम्याची रक्कम मिळणे आवश्‍यक होते. मात्र योग्य वेळी विमा हप्ते भरून आणि आवश्‍यक त्या कागदपत्रांच्या पूर्तता करून सुद्धा जिल्ह्यातील शेकडो सोयाबीन उत्पादकांना अजूनपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर
२०१९-२० या वर्षासाठी प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेंतर्गत विमा हप्त्याची रक्कम अकोला जिल्हा मध्यवर्ती को-ऑप.सहकारी बँक अकोला खडकी शाखेत भरली आहे. बँकेत विचारणा केली असता, ॲग्रीकल्चर इन्शोरन्स ऑफ इंडिया यांचेकडे याबाबत जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले. तरीसुद्धा आम्हाला पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. कोरोना महामारीमुळे आधिच जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशा मागणीसह शिवापूर, सोमठाणा, अकोली, चांदूर येथील शेतकरी सोमवारी (ता.६) जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री कार्यालयावर धडकले व तेथे निवेदन सादर केले.

सर्व आवश्‍यक कागदपत्रे, माहिती दिलेली असून व विमा हप्ते भरलेले असूनही कौलखेड महसूल मंडळातील शेकडो शेतकरी अजूनही खरीप २०१९-२० मधील सोयाबीन पीक विम्याच्या रकमेपासून वंचित आहेत. महत्त्वाचे म्हणजे संबंधित विमा कंपनीचे कार्यालय केवळ मुंबई व दिल्ली येथे असल्याने शेतकऱ्यांना कंपनीकडे संपर्क साधणे सुद्धा शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करून जिल्हास्तरावर विमा कंपनीचे कार्यालय देण्यात यावे व सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन तसेच इतर पिकांच्या विम्याची रक्कम तत्काळ अदा करण्यात यावी.
- प्रल्हाद ढोरे, शेतकरी, शिवापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Farmers still scrambling for soybean crop insurance, sowing in second year season also completed