Akola : ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम आजपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola

Akola : ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम आजपासून

अकोला : जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवार पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या ग्रामपंचयातींसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी इच्छुक २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करु शकतील. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करावी लागणार आहे. थेट सरपंच निवडीमुळे मतदारांमध्ये निवडणुकीचा उत्साह अधिक आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर अखेर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर केला. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर तालुक्यातील तब्बल २६६ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान तर २० रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान सोमवार २८ पासून प्रत्यक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार असून ग्रामीण भागात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

या निवडणुकीत सरपंच पद थेट जनतेतून निवडून देम्यात येणार असल्याने उमेदवार व मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. गावागावात पुढाऱ्यांनी पॅनल उभे केले असून जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून सरपंच पदाची उमेदवारी देवू केली आहे. त्या अनुषंगाने मतदारांची जुळवाजवळ केल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुका व जिल्हा स्तरावरील नेत्यांनी देखील गावाच्या राजकारणात लक्ष घातले असून ऐन हिवाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापवले आहे.

असा दाखल करावा लागेल अर्ज

उमेदवारी अर्ज राज्य निवडणूक आयोगाच्या ‘पंचायतइलेक्शन.महाराष्ट्र.जीओव्ही.ईन’ या वेबसाईटवर भरुन त्याची उमेदवारांना प्रिंट आऊट काढावी लागेल. त्यावर स्वाक्षरी करुन ते अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार यांच्याकडे सादर करावा लागेल. एक उमेदवार एकापेक्षा जास्त प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल करु शकतो. परंतु एका प्रभागात केवळ एकाच जागेसाठी (आरक्षणासाठी) अर्ज दाखल करता येईल. एका जागेसाठी जास्तीत-जास्त चार नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील.

या ग्रा.पं. मध्ये निवडणूक

तालुका ग्रा.पं

तेल्हारा २३

अकोट ३७

मूर्तिजापूर ५१

अकोला ५४

बाळापूर २६

बार्शीटाकळी ४७

पातूर २८

एकूण २६६

उमेदवारांना द्यावी लागणार कागदपत्रे

जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र किंवा पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केल्याचा पुरावा. (राखीव प्रवर्गातून लढत असल्यास)

शौचालय वापराचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायतीचा ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायतीची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र

निवडणूक खर्चाचे हिशोब सादर करण्याठी नवीन बँक खात्याच्या पासबुकची छायापत्र. (जुने खाते चालणार नाही)

उमेदवाराने नवीन बँक खाते राष्ट्रीयकृत, शेड्यूल्ड किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये उघडावे.

दोन पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो.

महिलांच्या नावात बदल असल्यास दोन्ही नावे एकाच व्यक्तीची असल्याबाबत पुरावा किंवा प्रतिज्ञापत्र.

१ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्या व्यक्तीचे इयत्ता ७वी पास चे प्रमाणपत्र सादर करावे.

निवडणूक कार्यक्रमावर दृष्टीक्षेप

२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर - अर्ज दाखल करण्याची मुदत

 ५ डिसेंबर - अर्ज छाननी

 ७ डिसेंबर - अर्ज मागे घेण्याचा

दिनांक, निवडणूक चिन्ह वाटप

 १८ डिसेंबर - मतदान

 २० डिसेंबर - मतमोजणी

 २३ डिसेंबर - निकालाची अधिसूचना