Akola : गावगाडा सज्ज; ग्रामपंचायतीसाठी मतदान आज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakla

Akola : गावगाडा सज्ज; ग्रामपंचायतीसाठी मतदान आज

अकोला : जिल्ह्यातील २६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता. १७) ८३२ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदान केंद्रांवर मतदान पथके शनिवारी (ता. १७) सायंकाळी पोहचले. या निवडणुकीत सरपंचपदासाठी ९३६, तर सदस्य पदासाठी ३ हजार ८६७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीत एकूण तीन लाख ७ हजार ६४० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर तालुक्यातील तब्बल २६६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार सदर ग्रामपंचायतींपैकी एक ग्रामपंचाय बिनविरोध झाल्याने उर्वरित २६५ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान तर २० रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. सदर ग्रामपंचायतींसाठी २८ नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. या निवडणुकीत सरपंच पद थेट जनतेतून निवडून देण्यात येणार असल्याने उमेदवार व मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे.

त्यासोबतच सरपंच पदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने उडी घेतली असून पक्षाकडून उमेदवार उभे करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेत सरपंच पदासाठीचे सात तर सदस्य पदासाठीचे ४२ उमेदवारी अर्ज अवैध ठरले. चार सरपंच पदांची निवडणूक अविरोध झाली असून, चार सरपंचपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने २५८ सरपंच पदांसाठी ९३६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

५७१ सदस्यांची निवडणूक अविरोध झाली आहे. तर सदस्य पदासाठी तीन हजार ८६७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान निवडणूक प्रक्रियेअंतर्गत रविवारी (ता. १८) सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला सुरुवात होणार असून ५.३० वाजेपर्यंत मतदार मतदान करू शकतील. त्यानंतर मंगळवारी (ता. २०) मतमोजणी करण्यात येणार आहे.

अशा आहेत मोठ्या ग्रामपंचायती

तेल्हारा तालुक्यात ६२ पैकी २३, अकोट-८४ पैकी ३७, मूर्तिजापूर-८६ पैकी ५१, अकोला- ९७ पैकी ५४, बाळापूर ६६ पैकी २६, बार्शीटाकळी- ८० पैकी ४७, पातूर- ५७ पैकी २८ अशा एकूण ५३२ पैकी २६६ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यात सात सदस्यीय ग्रामपंचायती १९८, ९ सद्स्यीय ५५, ११ सदस्यीय ८, १३ सदस्यीय ३ तर १५ व १७ सदस्यीय प्रत्येकी एका ग्रामपंचायत आहे. प्रत्यक्षात निवडणूक जाहीर झाली त्यावेळी एकूण ८१७ प्रभागांमध्ये ही निवडणूक व्हावयाची होती व त्यात २०७४ सदस्यांची निवड करावयाची होती.

प्रतिबंधात्मक आदेश जारी; मद्यविक्री बंद

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने १८ रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान केंद्र, मतमोजणीचे ठिकाण, सुरक्षा कक्ष इत्यादी ठिकाणांच्या २०० मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यासोबतच मतदान प्रक्रिया निर्भय व निष्पक्ष वातावरणात व्हावी तसेच या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी १७, १८ व मतमोजणीच्या दिवशी २० डिसेंबर रोजी संंबंधित क्षेत्रात संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.