Akola Gram Panchayats Election : भवितव्य ईव्हीएम बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola

Akola Gram Panchayats Election : भवितव्य ईव्हीएम बंद

अकोला : जिल्ह्यातील २६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता. १७) सकाळी ७.३० वाजतापासून जिल्ह्यातील ८३२ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. या निवडणुकीत सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्य पदासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली तरी थेट सरपंच पदाच्या निवडणुकीमुळे संपूर्ण निवडणूक सरपंच पदी केंद्रीत राहिल्याचे प्रचार व मतदाना दरम्यान दिसून आले.

मतदान प्रक्रियेत सुरुवाताली ग्रामीण भागातील मतदारांचा उत्साह कमी दिसून आला, परंतु नंतर मात्र काही मतदान केंद्र वगळता इतर केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांनी उत्साह दाखवल्यामुळे ४ हजार ८०३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम बंद झाले. दरम्यान मतमोजणी मंगळवारी (ता. २०) होणार असल्याने ईव्हीएम सुरक्षितरित्या सील करुन ठेवण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर तालुक्यातील तब्बल २६६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार सदर ग्रामपंचायतींपैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरित २६५ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजतापासून जिल्ह्यातील ८३२ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरु झाली. यावेळी मतदानापूर्वी सर्वच मतदान केंद्रांवर मॉक ड्रिल घेण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला काही मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह कमी असल्याचे दिसून आले.

परंतु नंतर मात्र मतदारांचा उत्साह उत्स्फूर्तपणे वाढल्याचे दिसून आले. दुपारनंतर तर बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. निवडणुकीत ३ लाख ७ हजार ६४० मतदारांना मतदानाचा हक्क मिळाला होता. दरम्यान मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर सर्व ईव्हीएम सील करुन रात्री संबंधित तालुक्यातील मतमोजणी ठिकाणी गोदामात ठेवण्यात आल्या आहेत. मतमोजणी मंगळवारी (ता. २०) होणार असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली असून मतदारांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.

आठवडी बाजार राहणार बंद

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी २० डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मार्केट ॲंड फेअर ॲक्‍ट १९६२ चे कलम ५च्या तरतूदीनुसार जिल्‍ह्यातील ग्रामपंचायत मतदारसंघात मतमोजणीच्या दिवशी २० डिसेंबर रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्‍याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी निर्गमित केले आहे. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी आठवडी बाजार बंद राहतील. याव्यतिरिक्त मतमोजणीच्या दिवशी २० डिसेंबर रोजी संंबंधित क्षेत्रात संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.