Akola : पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola heavy rain farmer crop damage

Akola : पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश

वाशीम : जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्यात यावे. जेणेकरुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना मदत करता येईल. असे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. विमा कंपनीच्या एजेंटनी पारावर बसून सर्वेक्षण केल्याच्या घटना घडल्या असून त्याची वस्तुनिष्ठता तपासणार कशी असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून विचारला जात आहे.

जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असताना शेतकरी हवालदिल झाला होता. अतिवृष्टीच्या निकषा पलिकडे पाऊस झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला. त्यांच्या शेतीचे पंचनामे करून अहवाल तयार करण्याचे काम विमा कंपनीकडे आहे. मात्र अनेक गावात विमा कंपनीच्या एजेंटनी पारावर बसून सर्वेक्षण आटोपले. तसेच कोणताही नियम नसताना सात बारा, आठ अ, क पासबुक व आधार कार्डची झेरॉक्स ही कागदपत्रे गोळा केली वरून शंभर रूपये नगदी उकळले.

वाशीम तालुक्यातील पार्डी टकमोर येथे हा प्रकार समोर आल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दखल घेत शेतकऱ्यांजवळून कोणतीही कागदपत्रे न घेता शेतात जावून सर्वेक्षण करावे असे आदेश काढले. विमा कंपनीच्या या सदोष सर्वेक्षणानंतर अखेर जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी आता वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्याचे आदेश बजावले आहेत.

जिल्ह्यातील २ लक्ष ७६ हजार ३०३ शेतकऱ्यांनी सन २०२२-२३ च्या खरीप हंगामात २ लक्ष ७ हजार २१३ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला आहे. त्यापैकी ६२ हजार २८३ हेक्टर क्षेत्र पंचनाम्यासाठी पात्र ठरले आहे. यंदाच्या खरीप हंगामात ३ लक्ष ९० हजार २८६ हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतीचे ४९२ सर्व्हेअरच्या माध्यमातून आजपर्यंत ५० हजार ५७७ शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत.

आज ३० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०२२-२३ अंतर्गत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची सभा श्री. षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. सभेला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ भरत गिते, शेतकरी सुरेश सानप, अनिल पाटील, राधेश्याम मंत्री व पिक विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक सोमेश देशमुख यांची उपस्थिती होती.

ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.त्या शेतकऱ्यांना विम्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत विमा कंपनीने ३ सप्टेंबरपर्यंत पीक नुकसानीचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांनी नुकसानीची सूचना अर्जाद्वारे ७२ तासाच्या आत दिली पाहिजे. नुकसानीची सूचना संबंधित शेतकऱ्यांनी योग्य त्या वेळेत संबंधित क्रॉप इन्सुरन्स ॲप्लीकेशनवर करावी.

- षण्मुगराजन एस जिल्हाधिकारी वाशीम

Web Title: Akola Heavy Rain Farmer Crop Damage Survey Insurance Collector Orders

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..