
अकोला : हॉलिटे टूरच्या नावाखाली अकोलेकरांना गंडा
अकोला : कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी अनेकांनी कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. त्यासाठी टूर ॲण्ड ट्रॅव्हल्स पॅकेज देणाऱ्या कंपन्यांचा शोध घेतला. हीच संधी साधून तीन भामट्यांनी अकोलेकरांची हॉलीडे टूरच्या नावाखाली फसवणूक केली आणि लाखो रुपये गोळा करून पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच टूर पॅकेज बूक करणाऱ्यांनी खदान पोलिस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच ओघ सुरूच असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अकोल्यात एका हॉटेलमध्ये हॉलिडे टूर फॅमिली पॅकेजच्या नावाखाली तथाकथित कंपनीच्या नावाखाली एक प्रमोशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ता. ७ एप्रिल रोजी आयोजित या कार्यक्रमात १०० च्या वर अकोलेकरांनी हजेरी लावली होती. यात उपस्थितांना तथाकथीत कंपनीचे संचालक असलेल्या तिघांनी तुम्ही फक्त ७५ हजार रुपये भरले की तुम्हाला हॉलिडे टूरमधील सर्व सुविधा पुरवल्या जातील, असे आश्वासन दिले. कंपनीच्या तथाकथीत संचालकांच्या भुलथापांना बळी पडत काही नागरिकांनी पैसेही भरले. मात्र, अनेक दिवस उलटूनही टूरबाबत माहिती दिली नसल्याने नागरिकांच्या आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी खदान पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रारी दाखल केल्या आहेत. आतापर्यंत दहा तक्रारी अर्ज खदान पोलिसांना प्राप्त झाल्या असून, आणखी काही नागरिक तक्रारी करण्याच्या तयारी आहेत. या प्रकरणात ३५ च्या वर नागरिकांची फसवणूक झाल्याची माहिती पुढे येत आहे.
भामट्यांचे लोकेश मुंबई, कल्याण परिसरात
एका तथाकथिक सेव्हन स्टार गोल्डन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या नावाखाली मुंबईतील तिघांना अकोल्यातील वेगवेगळ्या कार-शोरूममधून कार खरेदी करणाऱ्यांचे मोबाईल नंबर मिळविले. त्यानंतर या सर्वांना टूर पॅकेजबाबतची माहिती पाठवून आणि त्यांना फोनवर माहिती देवून कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सांगितेल. त्यानंतर ता. ८ एप्रिल रोजी एका हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात टूर बाबत माहिती देण्यात आली. तीन वर्षांकरिता प्रत्येक वर्षी सहा रात्री सात दिवसाच्या पॅकेजसाठी ७५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. यातील पन्नास टक्के रक्कम म्हणजे ३० ते ३७ हजार रुपयांपर्यंत काही नागरिकांनी भरले. त्यानंतर या तिघांनी पोबारा केला. पैस भरणाऱ्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हे भामटे सध्या मुंबई व कल्याण परिसरात फिरत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.
तीन वर्षांचे हॉलिटे टूर पॅकेजच्या नाखाली फसवणूक झालेल्या काही नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. तक्रारीचा ओघ सुरूच आहे. या सर्व तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत या प्रकरणाची चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. फसवणूक झालेल्यांकडून उकळण्यात आलेली रक्कम अधिक असल्यास तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे जाईल. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींचे मोबाईल नंबर ट्रेस करण्यात आले असून, ते मुंबई व कल्याण पसिरात असल्याचे दाखवित आहे. आरोपी राज्यातील असल्याने त्यांचा शोध घेतला जाईल.
- श्रीरंग सणस, पोलिस निरीक्षक, खदान पोलिस स्टेशन
Web Title: Akola Holite Tour Absconding
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..