
अकाेला : नियम धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूक सुरू
मालेगाव : तालुक्यात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूक सुरू आहे. लक्झरी बस, टॅक्सी परमिट, जिप व्हॅन तसेच इतर चारचाकी वाहनातून ही अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. क्षमतेपेक्षा कधी दुप्पट तर कधी तिप्पट प्रवासी बसवून ही वाहतूक सुरु आहे.
मालेगाव शहरातून रिसोड, मेहकर, वाशीम,अकोला, जऊळका रेल्वे इत्यादी गावाकरिता लक्झरी बस, टॅक्सी परमिट, जिप व्हॅन तसेच इतर ४ चाकी वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. या वाहनात प्रवासी वाहतूक क्षमतेपेक्षा तिप्पट प्रवासी बसविण्यात येतात. ही वाहने जुने बस स्थानक, अकोला फाटा, नवीन बस स्थानक जवळ उभी असतात. जुने बस स्थानक परिसरात नेहमीच वर्दळ असते. अशा ठिकाणी ही वाहने उभी असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ही वाहने व राज्य महामार्गावरून भरधाव धावणारी वाहने याने अपघात होऊन जीवित व वित्त हानी होऊ शकते.
या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाकडून वाहतूक पोलिस दरमहा ठरावीक रक्कम वसूल करतात. त्यासाठी त्यांनी काही एजंट नेमले आहेत. ज्या वाहन चालकांनी वसुलीची रक्कम देण्यास टाळाटाळ केली किंवा २-४ दिवस उशीर केला तर त्याचे वाहन चालन करतात. ही वाहने थांबबिण्याचे काम बऱ्याच वेळा वाहतूक पोलिसाऐवजी त्यांचे एजंट करतात. या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज आहे.
जुने बस स्थानक परिसरात लक्झरी बस, टॅक्सी परमिट जिप व इतर वाहने उभी असतात. ही वाहने व राज्य महामार्गावरील वाहने यामुळे अपघात होऊन जीवित व वित्त हानी होऊ शकते. इथे नो पार्किंग झोन च्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. नागरिकांच्या आरोग्याचा व जीविताचा विचार करून पोलिस व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी या अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालावा,
- शंकर इरतकर,सामाजिक कार्यकर्ते