अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचा १४ वर्षांचा वनवास! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway line

अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचा १४ वर्षांचा वनवास!

अकोला - दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा सर्वांत जवळचा मार्ग म्हणून पूर्णा-रतलाम रेल्वे मार्गाचे गेज परिवर्तन सुरू करण्यात आले होते. यातील पूर्णा ते अकोलापर्यंतचे काम २००८ मध्ये पूर्ण झाले. अकोला-अकोटपर्यंतचे कामही २०१८ मध्ये पूर्ण झाले. मात्र, त्यापुढील काम रखडल्याने या रेल्वे गेज परिवर्तनाचा खर्च पाटपटीने वाढला आहे. सन १८७० मध्ये होळकरांच्या राज्यात इंदूर ते खंडवापर्यंतच्या रेल्वे मार्गाचे काम पाच वर्षांत पूर्ण करण्यात आले होते. पुढे कापूस बेल्ड असलेल्या अकोला ते पूर्णपर्यंत रेल्वे मार्ग वाढविण्यात आला होता. दक्षिण भारतातील काचिगुडा रेल्वे स्थानकापासून थेट उत्तर भारतातील अजमेरपर्यंत हा मार्ग जोडला जातो.

रेल्वे प्रवासाची गती वाढविण्याच्या दृष्टीने या मार्गाचे गेज परिवर्तन आवश्यक होते. त्याच उद्देशाने अकोला मार्गे इंदूर, रतलामपर्यंत जाणाऱ्या ब्रिटिश कालीन नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याची योजना रेल्वे मंत्रालयाने आखली होती. हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने त्याला वन्यजीव प्रेमींनी तीव्र विरोध केला. त्यामुळे सन २००८ मध्ये पूर्णा-अकोलापर्यंतचे गेज परिवर्तन झाल्यानंतरही १४ वर्षांपासून अकोला ते रतलामपर्यंतच्या कामाला गती मिळाली नाही. १४ वर्षांच्या या वनवासाने गेज परिवर्तनाच्या कामाची किंमत पाच पटीने वाढवली आहे.

दोन टप्प्यातील कामाची गती मंदावली

अकोट- आमलाखुर्दपर्यंतच्या रेल्वे मार्गाबाबत केंद्र व राज्य सरकारला कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे या मार्गाचे भवितव्य पुढे अंधकारमय आहे. मात्र, महू-सनावाद आणि खंडवा-आमलाखुर्दपर्यंतच्या कामाची गतीही मंदावली आहे. महू ते सनावादपर्यंत गेज परिवर्तनासाठी २००८ मध्ये १४०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले होते. त्यावर मार्च २०२१ पर्यंत आतापर्यंत २४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, अद्यापही या मार्गाचे गेजपरिवर्तन पूर्ण झालेले नाही.

लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा पडतोय कमी

अकोला ते खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात अकोल्यातील लोकप्रतिनिधी कमी पतडाना दिसत आहे. रेल्वे मंत्रालयाने या मार्गासाठी ८८८ कोटी रुपये या आर्थिक वर्षात मंजूर केले. मात्र, हा निधी खंडवा ते सनावादपर्यंतच वापरता येणार आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अकोला जिल्ह्‍यात आले होते. त्यावेळीही लोकप्रतिनिधींनी त्यांच्यापुढे या रेल्वे मार्गाचा प्रश्न मांडला होता.

अकोला-अकोट मार्गाचे काम २०१८ मध्ये पूर्ण

पूर्णा ते अकोल्यापर्यंतचे काम पूर्ण झाल्यानंतर अकोला ते अकोटपर्यंत गेज परिवर्तनाचे काम सुरू करण्यात आले. प्रत्यक्षात हा खंडवापर्यंत २५७ किलोमीटर गेज परिवर्तनाचा टप्पा होता. मात्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या मार्गाला विरोध झाल्याने अकोट ते आमलाखुर्दपर्यंतचे गेज परिवर्तनाचे काम १४ वर्षांनंतरही सुरू होऊ शकले नाही. एकूण ७७ किलोमीटर मार्गाचे काम रखडले आहे.

पूर्णा-अकोला मार्गाचे काम २००८ मध्ये पूर्ण

पूर्णा ते अकोला या २०७ किलोमीटर रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनाचे काम नोव्हेंबर २००८ मध्ये पूर्ण झाले आहे. आता या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण सुरू आहे. अकोला-वाशीमपर्यंत विद्युतकरण लवकरच पूर्ण होणार आहे.

Web Title: Akola Khandwa Railway Line Has Been Stalled From14 Years

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AkolarailwayRailway Track
go to top