Akola : दारू वाहतूक करणाऱ्या टोळ्यांचा शहरात हैदोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

liquor Smuggling

Akola : दारू वाहतूक करणाऱ्या टोळ्यांचा शहरात हैदोस

वाशीम : जिल्ह्यात दारूचे कोणाकडेही ठोक विक्रीचा परवाना नसताना लाखो रूपयांच्या दारूच्या तस्करीला जिल्ह्यात उधाण आले आहे. या तस्करीसाठी वापरण्यात येणारे युवकच कायदा सुव्यवस्थेसाठी आव्हान ठरतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना उत्पादन शुल्क विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समोर येत आहे. दिवाळीच्या दिवशी येथील सुपखेला फाट्यावर दोन दारूतस्करांची गावाच्या वाटपावरून झालेली हाणामारी वाशीम शहराच्या कायदा सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरली असती.

जिल्ह्यात देशी विदेशी दारूचा पुर आता गावखेड्यापर्यंत पोचला आहे. जिल्ह्यात एकही ठोक विक्रीचा परवाना नसताना किरकोळ दारू विक्रीच्या दुकानातून भरदिवसा शेकडो पेट्यांची तस्करी केली जात आहे. या दारूच्या पेट्या आडवळणाच्या गावापर्यंत पोचविण्यासाठी बेरोजगार युवकांना जाळ्यात ओढले आहे. एका पेटीवर दोनशे रूपये दिले जातात.

एका मोटरसायकलवर पोत्यात चार पेट्या ठेवून ही तस्करी केली जाते. एकदा दुकानातून पेट्या मोटरसायकलवर टाकल्यानंतर भरधाव वेगात इप्सिस्थळी पोच केली जाते. अशा चार ते पाच खेपा केल्या जातात. यामुळे दुपारपर्यंत दोन युवकाच्या हातात चार हजार रुपये पडतात. येथूनच या युवकांच्या वाममार्गाला लागण्याचा प्रवास सुरू होतो.

साधारण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले युवकच यासाठी निवडले जातात. या कमी वेळात मिळणाऱ्या तस्करीच्या पैशातूनच गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत असताना उत्पादन शुल्क विभाग मात्र दारूचा खप वाढला या मनोराज्यात दंग असल्याने गावखेड्यात हजारो संसारांची राखरांगोळी होत आहे.

तर अनर्थ घडला असता

दिवाळीच्या दिवशी दुपारी चार वाजता येथील सुपखेला फाट्यालगत दोन युवकांची फ्रिस्टाईल हाणामारी सुरू होती. रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांनी मध्यस्थी करून त्यांना कसेबसे आटोक्यात आणले. मात्र या भांडणाचे कारण चक्रावणारे होते. यातील एक युवक एका खेड्यात गेल्या सहा महिन्यांपासून दारू पोचवित होता.

याच खेड्यात दुसऱ्या युवकाने दारू पोचविणे सुरू केल्याने दोघांमधे हाणामारी झाली. मुख्य म्हणजे दोनही युवक भिन्न धर्माचे होते. मात्र प्रकरण निवळल्याने धार्मिक तेढ निर्माण होण्याचा अनर्थ टळला.

पानटपऱ्या किराणा दुकाने झाले अड्डे

दारू तस्करी करणाराकडून गावखेड्यातील पानटपर्या किराणा दुकाने कुठे पंक्चरची दुकाने या ठिकाणी दारू पोचविली जाते. यामुळे आता लहान गावातही दारू मुबलक प्रमाणात मिळत आहे. यामुळेच गावातील किशोरवयीन मुलेही व्यसनाच्या नादी लागले आहेत. उत्पादन शुल्क विभागात एकाच टेबलवर दहा वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्यांच्या आशिर्वादाने दारू तस्कर कायद्याला धाब्यावर बसवत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून या कार्यालयाची झाडाडती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.