अरे व्वा! हा मराठी माणूस ठऱला आखाती प्रदेशातील आठवा अब्जाधीश; मसालाकिंग म्हणून मिळविले नावलौकीक

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 12 June 2020

दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी आखाती प्रदेशातील अब्जाधीश भारतीयांच्या यादीत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ‘अरेबियन बिझनेस’ या जागतिक ख्यातीच्या माध्यमगृहाने वर्ष २०२० साठीची ही यादी ‘द इंडियन बिलीयनर्स क्लब’ या शीर्षकाखाली नुकतीच प्रसिद्ध केली. 

अकोला : दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी आखाती प्रदेशातील अब्जाधीश भारतीयांच्या यादीत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ‘अरेबियन बिझनेस’ या जागतिक ख्यातीच्या माध्यमगृहाने वर्ष २०२० साठीची ही यादी ‘द इंडियन बिलीयनर्स क्लब’ या शीर्षकाखाली नुकतीच प्रसिद्ध केली. 

गेल्या वर्षी या यादीत डॉ. दातार सोळाव्या क्रमांकावर होते. केवळ वर्षभरात त्यांनी व्यवसायाची प्रगती व विस्तार परिश्रमपूर्वक घडवत आखाती प्रदेशातील (जीसीसी रीजन) आघाडीच्या दहा अब्जाधीश भारतीयांमध्ये स्थान मिळवले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाीठी क्लिक करा

जिद्द, अफाट मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर डॉ. दातार यांनी गेल्या ३६ वर्षांत आपल्या व्यवसायाचा आखाती देशांत प्रचंड जम बसवला. त्यांची ‘अल अदिल ट्रेडिंग’ कंपनी अस्सल, स्वच्छ व सुरक्षित उत्पादनांमुळे आखाती देशांतील स्थानिक व भारतीयांच्या घराघरांत पोचली आहे. दुबईच्या शासकांनी धनंजय दातार यांना ‘मसालाकिंग’ बहुमानाने संबोधून त्यांच्या परिश्रम आणि कर्तृत्वाचा यथोचित गौरव केला आहे. दातार यांना भारताबरोबरच जागतिक स्तरावरही अनेक प्रतिष्ठित पुरस्कार लाभले आहेत.‘फोब्र्स मिडल ईस्ट’तर्फे गेली अनेक वर्षे ‘टॉप इंडियन लीडर्स इन द अरब वल्र्ड’ यादीत मानांकन देऊन त्यांचा गौरव होत आहे. ‘फोब्र्स मिडल ईस्ट’च्या मानांकन यादीत आखातातील आघाडीच्या १०० भारतीयांमध्ये सातत्याने झळकणारे ते बहुधा एकमेव महाराष्ट्रीय आहेत.

भारतीय संस्कृतीचे आखाती देशांमध्ये संवर्धन करण्यास तसेच दुबईमध्ये मराठी उपक्रम राबवण्यास ते सातत्याने मदत करतात आणि स्वतःही समाज कल्याणाचे विविध पुढाकार घेतात. त्यांना मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे सामाजिक उद्योजकता क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सध्या कोविड १९ विषाणूच्या जागतिक साथीचा फटका आखाती देशांतील स्थलांतरित भारतीय कामगारांनाही बसला आहे. रोजगार गमावलेले मनुष्यबळ, विद्यार्थी, महिला व लहान मुले, पर्यटक आदी अनेक भारतीय लोक आखाती देशांमध्ये अडकून पडले असून मायदेशी परतण्यासाठी आतुर आहेत.

अनेकांजवळचे पैसे संपुष्टात आल्याने त्यांची स्थिती दयनीय आहे. अशा गरजू भारतीयांच्या मदतीसाठी डॉ. दातार धावले आहेत. लॉकडाऊन काळात त्यांनी अनेकांना गरजेच्या वस्तूंचे व खाद्यपदार्थांचे संच वाटले आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन हजारांहून अधिक निर्धन भारतीयांना परतीच्या प्रवासाचे विमान तिकीट मोफत काढून दिले असून, प्रवासासाठी अनिवार्य वैद्यकीय चाचणीचा खर्चही उचलला आहे. हे काम पुढील काही महिने सुरूच राहील.

महाराष्ट्रातून गेलेले सुमारे ६० हजार भारतीय अद्यापही दुबईत अडकून पडले आहेत. त्यांना लवकरात लवकर व सुखरुप घरी परतता यावे यासाठी डॉ. दातार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी नुकताच संपर्क साधला आहे. माननीय ठाकरे यांनीही त्वरित प्रतिसाद देऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. परिणामी दुबई ते मुंबई दरम्यान विमान वाहतूक लवकरच पुन्हा सुरू होईल. आपल्या अधिकाधिक देशबांधवांना संकटाच्या काळात मदतीचा आधार देण्याचा निश्चय डॉ. दातार यांनी केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Marathi man became the eighth billionaire in the Gulf region; Gained notoriety as masalaking