esakal | जगप्रसिध्द लोणार सरोवरातील पाण्याचा रंग बदलला या कारणामुळे
sakal

बोलून बातमी शोधा

 akola marathi news Due to this the color of the water in the world famous Lonar Lake changed

 विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरामधीलहिरव्या रंगाचे पाणी हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवामुळे गुलाबी झाले असा अहवाल पुणे येथील आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने दिला आहे.  

जगप्रसिध्द लोणार सरोवरातील पाण्याचा रंग बदलला या कारणामुळे

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला :  विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरामधीलहिरव्या रंगाचे पाणी हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवामुळे गुलाबी झाले असा अहवाल पुणे येथील आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने दिला आहे.  

लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे.याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली.लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.

दरम्यान, लोणार येथील जगप्रसिध्द सरोवराच्या पाण्याचा गेल्या काही दिवसांपूर्वी बदलला होता. त्याचे कारण नुकतेच समोर आले आहे. हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवाला खारे व आम्लयुक्त पाणी फार आवडते. अशा गुणधर्माचे पाणी मिळाल्यानंतर त्यांची झपाट्याने वाढ होते.

यावर्षी उष्ण तापमानामुळे लोणार सरोवरातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले. परिणामी, या पाण्यातील खारेपणा व आम्ल नेहमीच्या तुलनेने अधिक वाढले.

त्यातून हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवाला पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या झपाट्याने वाढली. हे सूक्ष्मजीव तीव्र सूर्यकिरणापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी बेटा कॅरोटीन हे गुलाबी रंगद्रव्य मोठ्या प्रमाणात निर्माण करतात. त्यामुळे लोणार सरोवरातील हिरव्या पाण्याचा रंग अचानक बदलून गुलाबी झाला असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.


हॅलोअर्चिया सूक्ष्मजीव लोणार सरोवरात कुठून आले, या प्रश्नाचे उत्तरही आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने दिले आहे. फ्लेमिंगो पक्षी गेल्यावर्षी अनेकदा लोणार सरोवरात आले होते. हे सूक्ष्मजीव फ्लेमिंगो पक्ष्यांच्या पंखांमध्ये जिवंत राहू शकतात.

या पक्ष्यांच्या माध्यमातून या सूक्ष्मजीवांचा लोणार सरोवरामध्ये प्रवेश झाला असावा असे गृहितक अहवालात मांडण्यात आले आहे.


इराणमधील सरोवरही झाले होते गुलाबी
या सूक्ष्मजीवांमुळे इराण येथील उमरिया सरोवरातील पाणीही गुलाबी झाले होते अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. त्यावरून जगामध्ये विविध ठिकाणी असा चमत्कारिक प्रकार घडून गेल्याचे स्पष्ट होते. याशिवाय आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने मुंबईतील खाºया पाण्याच्या ठिकाणी आणि राजस्थानमधील सांभर सरोवरामध्ये हे सूक्ष्मजीव आढळून आल्याचे अहवालात म्हटले आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका प्रलंबित आहे. आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सदर अहवाल दिला आहे.