यंदाचा उन्हाळाही घरात काढण्याचे संकेत,  जिल्हा लॉक डाउनच्या दिशेने!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 February 2021

 दुसर्‍या टप्प्यात वाढू लागलेला कोरोना रुग्णांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही. पूर्ण संपला असे वाटत असतानाच वाढलेला हा आकडा सर्वांनाच धडकी भरविणारा आहे. 

बुलडाणा :  दुसर्‍या टप्प्यात वाढू लागलेला कोरोना रुग्णांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही. पूर्ण संपला असे वाटत असतानाच वाढलेला हा आकडा सर्वांनाच धडकी भरविणारा आहे. त्यामुळे एका अर्थाने आगामी काळात आणखी कडक निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, विभागीय आयुक्त पीयूषसिंग यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात सकाळी 9 ते 17 पर्यंत सर्व दुकाने उघडे राहणार असून, त्यानंतर संचारबंदी राहणार आहे.

दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा पूर्ण लॉक डाउनची परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत निर्माण झाले आहे.

विदर्भात रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याची बाब चिंताजनक बनली आहे. मध्यंतरीच्या काळात झालेल्या निवडणुका, बाजार व नागरिकांची बेफिकिरी यामुळे हा धोका आणखी वाढू लागला आहे. आज तर बुलडाणा जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा एकाच दिवसात तीनशेच्या पुढे गेला आहे. धोका वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणा ही ऍक्शन मोडवर आली आहे. त्यामुळे नमुने घेण्याचे प्रमाणही लक्षणीय वाढविले आहे.  3159 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी काल पाठविण्यात आले होते. त्यापैकी निम्मे म्हणजेच 1572 नमुने प्राप्त झाले आहेत.

यापैकी  1235 नमुने निगेटिव्ह तर 301 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आजच्या घडीला ही जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत. आजवर जिल्ह्यात 116 हजार 146 नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यापैकी 14 हजार 590 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे, तर तब्बल 187 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. आजवर एकूण एक लाख 43 हजार 668 नमुने तपासण्यात आले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्ह निघण्याचा दर हा 11:33 एवढा आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नव्वद 90:36 एवढे आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व यंत्रणा पुन्हा एकदा कामाला लागले आहेत.

बुलडाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे व तहसीलदार रूपेश खंडारे यांनी एकत्रितरीत्या मोहीम राबवून शहरातील गर्दीच्या ठिकाणी जाऊन स्वतः नागरिकांना मास्क वापरण्याचे व कारवाई टाळण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनाने सोमवारी चिखली येथे भरणारा आठवडी बाजारही रद्द केला आहे. तसेच शहरातील व जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय व हॉटेल्स यांनाही वेळोवेळी सूचना देऊन मर्यादित संख्येमध्ये व ठरवून दिलेल्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत वारंवार सूचना दिलेल्या आहेत. ही सर्व उपाययोजना करूनही रुग्णांची संख्या आटोक्यात न आल्यास लॉक डाऊन सारखे कठोर निर्णयही पुढील काळात घेतले जाऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी उपाययोजना करावी व स्वतःच स्वतःचे रक्षक बनावे असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.
 

 असे दिले निर्देश
नगरपालिका क्षेत्रातील उद्योग सुरू राहणार, शासकीय व खासगी कार्यालयात केवळ 15 कर्मचार्‍यांची उपस्थिती, इतर शहरात खरेदी करण्यासाठी जाण्यावर मनाई, सर्व प्रकारचे हॉटेल, उपहारगृहातून केवळ पार्सल सुविधा, लग्नासाठी केवळ 25 व्यक्तींना परवानगी, सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये (विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा) येथील अशैक्षणिक कर्मचार्‍यांना कामासाठी परवानगी, मालवाहतूक विनाविस्कळीत सुरू, सार्वजनिक व खासगी वाहतुकीसाठी चार चाकी गाडीत चालकाव्यतिरिक्त इतर तिघे तर तीन चाकी वाहनात चालकाव्यतिरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह दोघांना परवानगी, आंतरजिल्हा बस वाहतूक करताना एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवासीसह शारीरिक अंतर व निर्जंतुकीकरण करत वाहतूकीकरीता परवानगी, सर्व धार्मिकस्थळे ही एकावेळी 10 व्यक्तींपर्यंत मर्यादीत, ठोक भाजीमंडई सकाळी 3 ते 6 या कालावधीत सुरू, संपूर्ण ग्रामीण व शहरी भागातील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद, सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाण बंद, सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन संचारबंदी कालावधीत बंद राहणार आहे.
 दोन टप्प्यात मुदत व सूट
सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी 9 ते 17 या वेळेत सुरू राहणार आहे. आठवड्याअखेर शनिवारी 17 वाजेपासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी सर्व बंद राहणार आहे. आठवडा अखेर असलेल्या संचारबंदीच्या वेळी दुग्धविक्रेते, डेअरी दुकाने ही यापुढेही सकाळी 9 त 17 या दरम्यान आठवड्याचे 7 ही दिवस सुरू राहणार आहे. सदर निर्बंध हे 1 मार्च 2021 पर्यंत सकाळी 8 वाजेपर्यंत घालण्यात आले असल्याचेही स्पष्ट केले आहे.

संपादन - विवेक मेतकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Towards Buldana District Lockdown