
अंत्यसंस्काराच्या पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत बारा मुलींनी लाडक्या पित्याला साश्रू नयनांनी खांदा दिला. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील शेंदुरजना (आढाव) गावात अंतिम निरोपाचा हा दु:खद प्रसंग हजारो गावकऱ्यांनी अनुभवला.
बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप
मानोरा (जि.वाशीम) : अंत्यसंस्काराच्या पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत बारा मुलींनी लाडक्या पित्याला साश्रू नयनांनी खांदा दिला. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील शेंदुरजना (आढाव) गावात अंतिम निरोपाचा हा दु:खद प्रसंग हजारो गावकऱ्यांनी अनुभवला.
ग्रामीण भागात शिक्षणाची पाळेमुळे रुजवणारे दानशूर सखाराम गणपतराव काळे यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मुलगा नसल्याची कोणतीही उणीव यावेळी त्यांच्या बारा कन्यांनी भासू दिली नाही.
हेही वाचा - शंकरपाळ्या अन् कारल्याच्या भांडणात छोट्या भावाची एन्ट्री, वाद मिटणार की आणखी वाढणार?
बारा लेकींकडून पित्याला मुखाग्नी
वाशिम जिल्ह्यातील शेंदुर्जना आढाव येथील सखाराम काळे यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काळेंना 12 मुली असून, मुलगा नाही. त्यामुळे त्यांच्या मुलींनी पार्थिवाला खांदा देऊन अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेले. त्यानंतर पार्थिवाला अग्नीही मुलींनीच दिला. त्यामुळे पंचक्रोशीत हा कुतुहलाचा विषय ठरला आहे.
हेही वाचा - प्रेमात आंधळा झालेल्या प्रियकरचा असाही प्रताप, धक्कादायक पाऊल उचलल्याने पोलिसांच्याही डोक्याला ताप
शिक्षणाचा वसा देणारे सखाराम काळे
सखाराम काळे यांचा जन्म 14 सप्टेंबर 1934 रोजी मानोरा तालुक्यातील शेंदुरजना येथे सधन कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची ओढ होती. आपले चुलत बंधू नामदेवराव काळे यांच्या सोबतीने ग्रामीण भागात त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. खेड्यातील मुलांना उच्च शिक्षण गावातच मिळावे, या ध्येयाने ते प्रेरीत होते. आज आप्पास्वामी शिक्षण संस्थेचा होत असलेला लौकीक सखाराम आणि नामदेवराव काळे यांच्या योग्य नियोजनाचे फलितच.
हेही वाचा - शाळा उघडल्या पण विद्यार्थी कुठे आहेत? शाळेसाठी केवळ 42 हजार पालकांचीच संमती
पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा
सखाराम काळे गेल्या काही दिवसांपासून वयोमानापरत्वे आजारी होते. गुरुवारी त्यांचे निधन झाले. शुक्रवारी अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या बारा मुलींनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. पित्याला खांदा देऊन सर्व अंत्यसंस्कारही पार पाडले. पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत या बारा लाडक्या मुलींनी आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. हा प्रसंग पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्याचं दिसून आलं.
(संपादन - विवेक मेतकर)
क्लिक करा - अकोला जिल्ह्यातील बातम्या
Web Title: Akola Marathi News Twelve Daughters Perform Last Rites Father Washim
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..