Akola : शेतकऱ्याच्या मुलीचे MPSC मध्ये यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 देवीभारती उल्हास महल्ले

Akola : शेतकऱ्याच्या मुलीचे MPSC मध्ये यश

अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) तर्फे जाहीर झालेल्या निकालामध्ये दिग्रस खु. (ता. पातुर जि. अकोला) येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी देवीभारती उल्हास महल्ले हिने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून उद्योग निरीक्षक हे पद मिळविले.

ग्रामीण भागात राहत असलेले वडील व्यवसायाने शेतकरी होते. त्यांची इच्छा नेहमीच आपल्या मुलीला उच्च पदावर कार्यरत होताना पहायचे होते. परंतु उल्हास महल्ले यांचे वर्षाभरापूर्वी अकाली निधन झाल्याने त्यांना हे मुलीचं यश पाहता आले नाही. परंतु मुलगी देविभारती हिने जिद्द आणि कठोर मेहनतीने यश संपादन करून वडिलांचे स्वप्न साकार केले.

वडिल गेल्यानंतर जावई नितीन फाटकर यांनी तिला धीर देत सर्व शिक्षणाची जबाबदारी घेऊन परीक्षा देण्यासाठी खूप साहाय्य केले आणि त्या प्रयत्नाने देविभारती हिने उद्योग निरीक्षक या पद मिळविले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत दिग्रस खुर्द येथील पहिली मुलगी उत्तीर्ण झाल्यामुळे देविभारतीचे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे.

तिचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा दिग्रस (खु) येथे तर माध्यमिक शिक्षण जागेश्वर विद्यालय वाडेगाव आणि पदवीचे शिक्षण खंडेलवाल कॉलेज अकोला येथे झाले. बारावीत ‘जागेश्वर’मधून प्रथम येण्याचा मान मिळविला होता. त्यानंतर बीएससीलाही तिने तिन्ही वर्ष प्रथम क्रमांक मिळविला होता. इन्पायर अर्वाडमध्ये शासनाची चार लाख रुपयांची शिष्यवृत्तीही देवीभारतीला मिळाली होती. तिने यशाचे श्रेय तिचे आई-वडील आणि जावई सैनिक नितीन फाटकर तसेच शिक्षक वृंद यांना दिले आहे.

अकोला : वडील उल्लाह महल्ले यांच्यासोबत देवीभारती. आज मुलीचे यश बघण्यासाठी वडील हयात नसले तरी देवीभारतीने त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

पीएसआयच्या परीक्षेतही यश

एमपीएससीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उद्योग निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या देवीभारती महल्लेने एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत प्राथमिक व मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मात्र, देवीभारती उद्योग निरीक्षक म्हणून निवड झाल्यामुळे या पदावरच कार्यरत राहण्यास उत्सुक आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरूण-तरूणींनी अभ्यासात सातत्य ठेवल्यास आणइ जिद्दीने प्रयत्न केल्यास कोणतेही यश मिळविता येऊ शकते.

- देवीभारती महल्ले, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थिनी, दिग्रस खु.