
अकाेला : तेल्हारा तालुक्यातील २५ गावे अंधारात!
तेल्हारा - पथदिव्याकरिता असलेल्या जोडणीचे देयके ग्रामपंचायतींनी भरली नसल्यामुळे थकीत वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने धडक कारवाई करून तालुक्यातील तब्बल २५ ग्रामपंचायतीचे पथदिव्यांचे कनेक्शन कापले आहेत. गत एक महिन्यांपासून कनेक्शन कापून देखील देयके न भरल्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील पथदिवे बंद असल्याने या गावात अंधार पसरला आहे.
पूर्वी ग्रामपंचायती अंतर्गत पथदिव्याच्या कनेक्शनचे वीज बिल जिल्हा परिषदेच्या वतीने भरले जात होते. परंतु, ता. १ जानेवारी २०२२ पासून जिल्हा परिषदेने वीज कनेक्शनचे बिल देणे बंद केले, असून ही बिले अदा करण्याची जवाबदारी ग्रामपंचायतींवर सोपविली आहे. परंतु, तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींनी आपल्याकडे असणारे वीज कनेक्शनच्या बिलाचा भरणा न केल्याने वीज वितरण कंपनीने पथदिव्यांना होणाऱ्या वीज कानेक्शनला कात्री लावली.
यामध्ये चिपी, गायरान, एदलापूर, धोंडा आखर, करी, भांबेरी, मनब्दा, अटकली, टाकळी, खापरखेड, खेलदेशपांडे, नर्सिपूर, खेलसटवाजी, आडसुळ, दहिगाव, वडगांव, निंभोरा, सांगवी, नेर, निंबोळी, दापुरा, सिरसोली या ग्रामपंचायतींचा समावेश, असून सदर ग्रामपंचायतींकडे वीज वितरण कंपनीचे थकीत बिलापोटी ८७ लाख सहा हजार ६६२ रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी भरल्याशिवाय गावातील पथदिव्यांना महावितरणकडून वीज पुरवठा केल्या जाणार नसल्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसातच गावात अंधार पसरला आहे. संंबंधित विभागाने तातडीने वीज बिल भरून गावातील पथदिवे चालू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केल्या जात आहे.
गावातील करवसुली जाते तरी कोठे?
ग्रामस्थांकडून स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे दिवा कर, आरोग्य कर, पाणी पुरवठा कर, घरपट्टी आदींच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात कर वसुली केल्या जाते. कर मागणीच्या ८० टक्के वसुली दरवर्षी ग्रामपंचायती करतात व तसा अहवाल देखील पंचायत समितीकडे ग्रामपंचायतीच्या वतीने सादर केला जातो, तरी सुद्धा वीज कनेक्शनचे बिले भरल्या जात नसतील, तर कराच्या रुपात गोळा केलेला महसूल खर्च तरी कोठे होतो? हा प्रश्न या निमित्याने उपस्थित होत आहे.
पथदिव्यांच्या देयकाचा निधी प्राप्त झाला आहे. लवकरच त्याचा भरणा करून कनेक्शन पूर्ववत करून घेण्यात येईल.
- भगतसिंग चव्हाण, गटविकास अधिकारी, तेल्हारा.
Web Title: Akola Mseb Telhara Taluka 25 Villages Street Lights Electricity Supply Cut Due To Pending Bills
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..