
अकोला : लोंबकळत असलेल्या विद्युत तारा धोकादायक!
वाडेगाव : उच्च दाबाच्या वीज जोडणीचे खांब वाडेगाव परिसरातील शेतीमधून गेले आहेत. या लोंबकळत असलेल्या धोकादायक जिवंत विद्युत तारा शेतकरी, शेतमजुरांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. उच्च दाबाच्या विद्युत तारा जमिनीपासून अवघ्या काही अंतरावर असल्याचे दिसून येते. या लोंबकळत असलेल्या विद्युत ताराबाबत संबंधित विभागाकडे तक्रार देऊनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
बाळापूर तालुक्यात जिवंत विद्युत तारा तुटून पडल्याने जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाडेगाव परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. बाळापूर तालुक्यातील मांडोली येथील शेत शिवारात बाळापूर येथील मोबिन खान जबीउल्ला खान (वय ३०) हे ता. ८ जून रोजी आपले बैल शेतात घेऊन जात असताना जिवंत विद्युत तार त्यांच्या अंगावर पडल्यामुळे मोबीन खान यांच्यासह त्यांच्या बैल जोडीचा घटनास्थळीच दुदैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे, गत वर्षी तालुक्यातील देगाव येथील शेतकरी दिलीप गावंडे यांच्या शेतात पिकाला डवरणीचे काम करत असताना एकाएक जिवंत विद्युत तार तुटून पडल्याने त्यांच्या एका बैलाचा जागेवरच मृत्यू झाला होता.
विद्युत वितरण कंपनीचा अक्षम्य दुर्लक्षितपणामुळे जिवंत विद्युत तार तुटून पडल्याच्या घटनेत जीवितहानी झाल्याच्या दुदैवी घटना घडल्या असल्याचा आरोप तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. बाळापूर तालुक्यातील अनेक शेत शिवारात उच्च विद्युत दाबाच्या तारा जमिनीपासून काही अंतरावर लोंबकळत असल्याचे चित्र दिसत आहे. या विद्युत तारामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विद्युत वितरण कंपनीकडून बाळापूर तालुक्यात सर्वेक्षण करून लोंबकळत असलेल्या तारांची उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षणामुळे काही जीवितहानीच्या घटना घडल्यास त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा.
- शिवाजी म्हैसने, तालुकाध्यक्ष, राकाँ, बाळापूर.
माझे शेत सिंचनाखाली आहे. शेतातून विद्युत तार लोंबकळत असल्याने संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु, याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. जिवंत विद्युत तार लोंबकळत असल्याने शेतीची पेरणी, आंतरमशागत कशी करावी?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- दत्तात्रय मानकर, शेतकरी, वाडेगाव.