Akola Municipal Corporation : इच्छुकांचा हिरमोड; नियोजनही बिघडले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


Akola Municipal Corporation political news

अकोला महानगरपालिका : इच्छुकांचा हिरमोड; नियोजनही बिघडले!

अकोला : विद्यमान नगरसेवक पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागले होते तर इच्छूक नव्याने रिंगणात उतरण्यासाठी तयारी करून बसले होते. या सर्वांचा हिरमोड करणारे विधेयक सोमवारी राज्या विधिमंडळात पारित करण्यात आले. या विधेयकामुळे महानगरपालिकेची निवडणूक सहा महिने लांबवणीवर पडली आहे.(Akola Municipal Corporation)

राज्याच्या विधिमंडळाने प्रभाग रचना व निवडणूक कार्यक्रमाबाबतचे नवीन विधेयक मंजूर केले. त्यामुळे अकोला महानगरपालिकेसह राज्यातील १४ महानगरपालिकेची निवडणूक किमान सहा महिनेतरी लांबवणीवर पडली आहे. ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने आणि ओबीसीशिवाय निवडणूक घेणे राजकीय हिताचे ठरणार नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवणीवर टाकल्या जाण्याची चर्चा सुरू होती. अखेर ही चर्चा खरी ठरविणारे विधेयकच विधिमंडळात पारित झाल्याने इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. सहा महिने निवडणूक लांबवणीवर पडल्याने निवडणुकीच्या तयारीसाठी करण्यात आलेले सर्वच राजकीय पक्षांचे नियोजनही आता बिघडले आहे. गाजावाजा करीत प्रभागात फिरणाऱ्या विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये शांतता पसरली आहे.

प्रभाग रचना रद्दची ‘कही खुशी, कही गम’

राज्यातील महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी करण्यात आलेली प्रभाग रचनाही विधिमंडळात पारित झालेल्या नव्या विधेयकामुळे रद्द झाली आहे. त्यामुळे प्रभाग रचनेवरून नाराजी असलेल्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर सोयीची प्रभाग रचना झालेल्यांची या निर्णयाने निराशा झाली आहे. प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी अकोला महानगरपालिका क्षेत्रातून झाल्या होत्या. त्यावर निवडणूक आयोगातर्फे सुनावणीही घेण्यात आली होती.

त्यामुळे ज्यांनी प्रभाग रचनेवर आक्षेप घेतले होते, त्यांच्यासाठी प्रभाग रचना रद्द झाल्याची आनंदवार्ता ठरली आहे.

राजकीय पक्षांच्या तयारीला ‘ब्रेक’

अकोला महानगरपालिकेची मुदत ता. ८ मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, या अपेक्षेने राजकीय पक्षांनी जोमाने तयारी सुरू केली होती. प्रत्येक बुथनियाह नियोजन करण्यात आले होते. काही पक्षांच्या इच्छुकांनी तर त्यांच्या प्रभागात दोन-तीन बैठकाही घेतल्या होत्या. मात्र, आता सहा महिने निवडणूक लांबणीवर पडल्याने राजकीय पक्षांच्या तयारीला ‘ब्रेक’ लागला आहे.

भंडारे वाया गेलेनं राव...!

प्रभाग रचना रद्द झाली...निवडणूकही लांबणीवर पडली...आतापर्यंत दिलेले भंडारे वाया गेले...असे एका ना अनेक विनोदी किस्से सोमवारी दुपारनंतर समाजमाध्यमांवर व्हायलर होत असून, ते तेवढ्याच चवणीने वाचलेही जात आहे.

Web Title: Akola Municipal Corporation Political News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top