
अकोला : एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका गट्टू बनविणाऱ्या कारखान्यातील कामगाराच्या खुनाचा पोलिसांनी तीन दिवसांनंतर यशस्वी शोध घेतला. कोणतेही पुरावे हाती नसताना पोलिसांनी शोध घेत कामगाराचे मारेकरी पती-पत्नीसह मानलेल्या भावाचा शोध घेत त्याना पोलिसांनी अटक केली.
शासकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातून एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाली की, एमआयडीसी तीनमधील गट्टू बनविण्याच्या एका कारखान्यातील कामगाराचा डोक्याला जखम झाल्याने मृत्यू झाला. शिवा कुकडे (५०) असे मृतकाचे नाव असून, तो पत्नीसह कारखान्यातील खोलीतच राहत होता. अपघातात पडल्यामुळे डोक्याला जखम होऊन मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक माहितील एमआयडीसे ठाणेदार किशोर वानखेडे यांना मिळाली. ते पोलिस कर्मचाऱ्यांसर सर्वोपचार रुग्णालयात पोहोचले.
तेथे मृतकाची तपासणी केली असता कपाळावर एखाद्या शस्त्रीने वार केल्याची जखम आढळून आली. सोबतच त्याचा उजवा पाय मोडला होता. त्याला रुग्णालयात दाखल करणाऱ्या व्यक्तीने मृतक हा घरात बेडवर जखमी अवस्थेत आढळून आला. ही माहिती त्याच्या पत्नीने दिली होती. अपघाताबाबत कोणतेही पुरावे मिळाले नाही. त्यामुळे पोलिसांनी तपासचक्रे फिरविली. त्यात मयत इसमाचे त्याच कंपनीतील हर्षा मंगळे आणि तिचा पती प्रवीण मंगळे याच्याशी ता. २ सप्टेंबरला भांडण झाल्याची माहिती मिळाली. या कारणांमुळे कंपनी मालकाने पती आणि पत्नीला कामावरून काढले होते. त्याचा राग म्हणून शिवा कुकडेला पती-पत्नीने बाहेर बघून घेण्याची धमकी दिली होती. ता. १४ सप्टेंबरला हर्षा मंगळे हिच्याशी शिवणी परिसरात शिवाची भेट झाली. तेव्हा शिवाने तिला शिवीगाळ केली.
हा प्रकार हर्षाने पतीला सांगितला. त्यांनतर शिवणी येथील हर्षाच्या मानलेला भाऊ आकाश पोळ याला प्रवीण मंगळेने बोलावून घेतले. दुपारी तीन वाजताच्या सुमारास तिघेही कंपनीत गेले. त्यावेळी शिवाची पत्नी ही ट्रान्सपोर्ट नगर येथे सरदारजी ढाबा येथे काम करायला गेली होती. शिवा हा कंपनीतील खोलीत खाटेवर झोपलेला होता. आकाश पोळ आणि प्रवीण मंगळे याने सोबत आणलेल्या हत्याराने शिवाच्या डोक्यावर, पायावर आणि छातीवर वार केले. त्यानंतर ते तेथून लपून निघून जात असताना त्यांना कंपनीत काम करणाऱ्या इतर कामगारांनी बघितले. या माहितीवरून पोलिसांनी भांदवि ३०२ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.
कुंभारी येथून हर्षाला घेतले ताब्यात
कैलासनगर कुंभारी येथून हर्षा मंगळे हिला ठाणेदार वानखेडे, हवालदार दंदी, हवालदार राठोड यांनी ताब्यात घेतले. तिचा पती हा बुलढाणा येथे गेला असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पतीसोबत ती शिवा याला जाब विचारायला कंपनीमध्ये गेले होते व तेथे त्याला फक्त त्याला हाताने मारहाण केल्याचे हर्षाने पोलिसांना सांगितले. मात्र, अधिक विचारपूस केली असता ती उडवा उडवीचे उत्तर देवू लागली. पोलिसांनी तिचा पती प्रवीण मंगळे आणि मानलेला भाऊ आकाश पोळ याचे लोकेशनवरून शोध घेतला असता ते शिवणीतच असल्याचे आढळून आल्याने त्यांनाही ताब्यात घेतले. त्या दोघांनीही पोलिसी खाक्या दाखवताच शिवाच्या खुनाची कबुली दोघांनी दिली.