
दाताळा येथील चौदा वर्षीय मुलगा तेजस नेहमीप्रमाणे पहाटे सहा वाजताच्या दरम्यान सायकलवरून फिरायला निघाला...
मलकापूर (जि.बुलडाणा): दाताळा येथील चौदा वर्षीय मुलगा तेजस नेहमीप्रमाणे पहाटे सहा वाजताच्या दरम्यान सायकलवरून फिरायला निघाला...
मात्र, काळ दबा धरून होता... दाताळा-ऊमाळी रस्त्यावर सायकलींग करित असताना अचानक एक वाहन आले आणि तेजसला धडक दिली अन् क्षणातच सर्वकाही संपले...
सविस्तर असे की, दाताळा बसस्थानकाच्या पाठीमागे राहणारा तेजस प्रदिप पाटील हा जेमतेम चौदा वर्षांचा मुलगा. नेहमीप्रमाणे तो सकाळी सहा वाजताच्या सुमारास सायकलवरून निघाला.
नेहमीप्रमाणेच त्याही ही सकाळ. मात्र, नियतीने डाव साधला. दाताळा- उमाळी रस्त्यावरून सायकल चालवितांना एक अज्ञात वाहन आले आणि जोराची धडक दिली.
तेजस हा दाताळा येथील डी.ई.एस हायस्कूल मध्ये नवव्या वर्गात शिकत होता. आई-वडील आणि दोन बहिणींच्या हसत्या खेळत्या परिवाराला नियतीची दृष्ट लागली. अन् गावभरात प्रचंड आक्रोश झाला.
या धडकीत चौदा वर्षांचा कोवळा तेजस काळाने हिरावून नेला. या अपघाताची माहिती विलास खर्चे यांना मिळताच त्यांनी ग्रामीण पोस्टेला फोनकरून सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापुर उपजिल्हा रुग्णालयात हलविला.
उपजिल्हा रुग्णालयात नगराध्यक्ष अॅड हरीश रावळ,अॅड.साहेबराव मोरे ,जि.प.सदस्य संतोष रायपुरे, मनसे (परीवहन) जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर,भाराकाॅ तालुकाध्यक्ष बंडुभाऊ चौधरी, पत्रकार प्रशांत उंबरकर आदिंनी धाव घेतली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बेहराणी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सचिन दासर,पो.हे.काॅ चंदु गायकवाड करीत आहे.
(संपादन - विवेक मेतकर)