
जिल्ह्यात सध्या कपाशी पिकाला गुलाबी बोंडअळीने करकचून विळखा घातल्याने, शेतकरी हतबल झाला आहे. या निराशेचा शेवट करत बहुतांश शेतकऱ्यांनी ‘उपट पऱ्हाटी पेर गहू’ अशी भूमिका घेतली असून, अनेकांनी कपाशीची शेते मोडली आहेत.
अकोला : जिल्ह्यात सध्या कपाशी पिकाला गुलाबी बोंडअळीने करकचून विळखा घातल्याने, शेतकरी हतबल झाला आहे. या निराशेचा शेवट करत बहुतांश शेतकऱ्यांनी ‘उपट पऱ्हाटी पेर गहू’ अशी भूमिका घेतली असून, अनेकांनी कपाशीची शेते मोडली आहेत.
यापूर्वी पावसाचा खंड, अतिवृष्टी, अवकाळी पावसाने मूग, उडीद, ज्वारीचे पीक पूर्णतः नष्ट केले असून, सोयाबीनचे उत्पादनही ५० ते ६० टक्क्यांनी घटले आहे. एकंदरीत विचार केल्यास ७० टक्के खरीप उत्पादन भुईसपाट झाले असून, आता केवळ तुरीवर शेतकऱ्यांची भिस्त उरली आहे.
तसे नित्याचेच परंतु, गेल्या तीन ते चार वर्षांत सातत्याने कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी खरीप, रब्बी व उन्हाळी पिके घेऊन कसेबसे उदरनिर्वाहाचा प्रयत्न करीत आहेत. २०१९-२० चा खरीप व रब्बी या दृष्ट चक्रातून सुटका करेल असे शेतकऱ्यांना अपेक्षित होते.
परंतु, यंदाही निसर्गाने घोर निराशा केली आहे. मॉन्सून उशिरा आल्याने जवळपास महिनाभर खरीप लांबला. सुरुवातीलाच पावसाने दिर्घ दांडी मारली. त्यानंतर विसावा न घेता शेतकऱ्यांना सततधार पावसाने गारद केले.
त्यामुळे खरिपातील उडीद, मूग, ज्वारी, मक्याचे पीक शेतकऱ्यांच्या हातात लागलेच नाही. अवकाळी व अतिवृष्टीने सोयाबीनचे पीक सुद्धा उद्ध्वस्त केले. कपाशीचे पीक मात्र यंदा चांगले दिसत असल्याने, या पिकातून निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती.
परंतु, ही अपेक्षा सुद्धा गुलाबी बोंडअळीने संपविली असून, जिल्ह्यातील बहुतांश भागातील कपाशीला गुलाबी बोंडअळीने ग्रासले असून, पीक निघत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक नष्ट करून गहू पेरण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीत यावर्षी जवळपास ७० टक्के खरीप उत्पादन उद्ध्वस्त झाले असून, आता केवळ तुरीवर शेतकऱ्यांची आशा उरली असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.
पिवळ्या तुरीवर वातावरणाचे काळे संकट
यंदा तूर उशिरा फुटली असली तरी, बहुतांश भागात सध्या तुरीचा फूलोर चांगलाच बहरल्याने शेते पिवळी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे तुरीचे पीक यावर्षी खरिपात सर्वोत्तम उत्पादन देईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. परंतु, गेल्या चार ते पाच दिवसांपासून अचानक वातावरणात बदल होऊन थंडी लुप्त झाली आहे. ढगाळ वातावरणाची निर्मिती होत असल्याने, आता तुरीवरही किडीचा मोठा प्रादुर्भाव होऊन हे पीक सुद्धा हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)