esakal | निसर्गातील गोष्ट जो सुंदर रीतीने मांडू शकतो तो ‘कलावंत’- विजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: The artist who can tell the story of nature in a beautiful way is Vijay Raut

कलावंत हा आपल्या कलेतून नवसृष्टी निर्माण करतो. लेखक त्याच्या लेखनातून बोलतो, कवी त्याच्या कवितेतून बोलतो, तसे चित्रकार व शिल्पकार यांना लिपीद्वारे बोलता येत नाही. ते त्याच्या चित्र व शिल्पातून बोलतात. जो निसर्गातील गोष्ट सुंदर रीतीने मांडू शकतो, तो ‘कलावंत’ असतो. या कलावंतांना, नवसृष्टीचे विश्वमित्र म्हटल्या गेले आहे, असे भावपूर्ण उद्‍गार वक्ते विजय राऊत यांनी काढले.

निसर्गातील गोष्ट जो सुंदर रीतीने मांडू शकतो तो ‘कलावंत’- विजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

कारंजा (लाड)  ः कलावंत हा आपल्या कलेतून नवसृष्टी निर्माण करतो. लेखक त्याच्या लेखनातून बोलतो, कवी त्याच्या कवितेतून बोलतो, तसे चित्रकार व शिल्पकार यांना लिपीद्वारे बोलता येत नाही. ते त्याच्या चित्र व शिल्पातून बोलतात. जो निसर्गातील गोष्ट सुंदर रीतीने मांडू शकतो, तो ‘कलावंत’ असतो. या कलावंतांना, नवसृष्टीचे विश्वमित्र म्हटल्या गेले आहे, असे भावपूर्ण उद्‍गार वक्ते विजय राऊत यांनी काढले.


कारंजा लाड येथे सुरू असलेल्या शरद व्याख्यानमालेच्या ऑनलाइन व्यासपीठावरून ते बोलत होते. ‘कला आणि सामाजिक बांधिलकी’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रारंभी उदयसिंह ठाकूर यांनी वक्त्याचे शाब्दिक स्वागत केले तर गोपाल कडू यांनी परिचय करून दिला. कलेविषयी बोलतांना विजय राऊत पुढे म्हणाले की, कला आणि विज्ञान यांचा जवळचा संबंध असून ते एकमेकांना पूरक आहेत.

भारतीय शैली, वारली, राजस्थानी, मोगली या चित्रकलेच्या शैली म्हणजे वास्तववादाचा उत्तम नमुना आहे. रोजच्या जीवनात सुद्धा कलेचे अस्तित्व आपल्याला जाणवते. आपले घर सुंदर असावे असे प्रत्येकाला वाटते. मग त्या अनुषंगाने आपण डिझाईन तयार करतो. आपली संस्कृती, परंपरा, लोकजीवन यांचे प्रतिबिंब या घर निर्मितीत दिसून येते. कलेच्या माध्यमातून क्रांती घडू शकते हे पटवून देताना ते म्हणाले की, ‘गरनिका’ हे पिकासोने काढलेले जगप्रसिद्ध पेंटिंग आहे. ‘गरनिका’ या ठिकाणी १९३७ साली नाझींनी बॉम्ब हल्ला केला.

अनेक लहान मुलं, बाया-माणसं यांचा नरसंहार झाला. या संहाराचे दारूण व बोलके चित्र पिकासोने काढले. जगाने जेव्हा हे चित्र पाहिले तेव्हा प्रक्षुब्ध झालेल्या जनतेने उठाव केला आणि राज्यक्रांती झाली. काही कलावंतांना तर जनतेचा रोष पत्करावा लागला. एम.एफ. हुसेन यांना त्यांच्या चित्रामुळे देश सोडावा लागला. डेव्हिड लो या चित्रकाराने तर त्याच्या कार्टूनमुळे साक्षात हिटलरला जेरीस आणले होते.

तेव्हा हिटलरने त्याच्या सहकाऱ्याला आदेश दिला की, त्याला माझ्या समोर जिवंत पकडून आणा. एवढी ताकद या चित्रांमध्ये असल्याचे राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र विचारदर्शी होते. आर.के. लक्ष्मण यांचे चित्र पाहिले की, उद्या काय होणार याची कल्पना आपल्याला यायची.


इथिओपियामध्ये दुष्काळ पडला होता तेव्हा, मायकल जॅक्सन यांनी गाणं म्हटलं होतं. त्याला खूप प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळे जगभरातून या देशाकरता मदतीचा हात पुढे येऊ लागला. कला ही सकारात्मक व नकारात्मक विचार निर्माण करू शकते. कलेत इतरांना कार्यप्रवण करण्याची क्षमता असू शकते.

खजुराहो चित्रातून आपल्याला विविध प्रकारची माहिती प्राप्त होते. कलावंत हा संवेदनशील असल्याने तो सामाजिक बांधिलकीशी आपोआप जोडल्या गेलेला असतो. हे सांगताना ते म्हणाले की, काही चित्र काढता काढता, त्यांना वृद्धाश्रम निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. केतन गोडबोले यांनी शारदास्तवन म्हटले. प्रशांत खानझोडे यांनी संचलन केले तर, सचिन ताथोड यांनी आभार व्यक्त केले.

(संपादन - विवेक मेतकर)