अरे बापरे! येथे चक्क पिण्याच्या पाण्याजवळ फेकले जाते ‘बायोमेडिकल वेस्ट’!

दीपक पवार
Friday, 18 September 2020

केंद्रशासन, राज्यशासन कोरोनाच्या या संकटकाळात स्वच्छतेवर भर देत आहे. मात्र, साधा कापसाचा बोळा सुद्धा इतरत्र न फेकू शकणारे रुग्णालय व्यवस्थापन आता मात्र चक्क पिण्याच्या पाण्याजवळ बायोमेडिकल वेस्टेज फेकत आहे. त्यामुळे कारंजा तालुक्यातील काही खाजगी रुग्णालयांमध्ये स्वच्छ भारत अभियानाला तडा दिल्या जात आहे.

कारंजा -लाड (जि.वाशीम) :  केंद्रशासन, राज्यशासन कोरोनाच्या या संकटकाळात स्वच्छतेवर भर देत आहे. मात्र, साधा कापसाचा बोळा सुद्धा इतरत्र न फेकू शकणारे रुग्णालय व्यवस्थापन आता मात्र चक्क पिण्याच्या पाण्याजवळ बायोमेडिकल वेस्टेज फेकत आहे. त्यामुळे कारंजा तालुक्यातील काही खाजगी रुग्णालयांमध्ये स्वच्छ भारत अभियानाला तडा दिल्या जात आहे.

कारंजा तालुक्यात कोरोना महामारीने आपली मुळे घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संसर्गाचा आलेख वाढतच असून, कारंजा तालुका प्रशासन व्यवस्था ही साखळी तोडण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

तालुक्यातील वैद्यकिय क्षेत्रातील काही नामवंत डॉक्टर सुद्धा त्यांच्या जीवाची परवा न करता नियमांच्या आधिन राहून रुग्णसेवा करीत आहेत. मात्र, काही रुग्णालये, स्थानिक प्रशासन विभाग कोरोनाकडेच लक्ष देत असल्याची बाब हेरून स्वच्छतेचे तीन-तेरा वाजवीत आहे. आजमितीला कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाने शासनाने खासगी रुग्णालयांना विविध नियमावली आखून दिल्या आहेत.

त्यामध्ये स्वच्छतेबाबत प्रकर्षाने उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, काही खाजगी रुग्णालयांमध्ये स्टाफमधील कर्मचारी गुटखा खाऊन भिंतीवर पिचकाऱ्या मारताना दिसत आहेत तर, नेमलेले साफसफाई कर्मचारी याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करीत आहेत. मुख्य डॉक्टर सुद्धा या घाणीकडे फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे खाजगी रुग्णालयात नातेवाईकांना अव्वाच्या सव्वा पैसे मोजूनही मनस्ताप सहन करावा लागतो आहे. शिवाय, काही ठिकाणी या कोरोनाच्या काळात रात्रीच्या वेळी नागरिकांना पाणी मिळणे दुरापास्त होत असल्याने, रुग्ण नातेवाईकांना अशुद्ध पाणी सुद्धा घशात उतरवावे लागत आहे.

रुग्णालयातील स्टाफ मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित किटचा वापर करताना दिसत नाही तर, रुग्णांचे नातेवाईक सुद्धा त्यांची नैतिक जबाबदारी धुळीस मिळवत सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडवित आहेत. या कठीण समयी काही नामवंत डॉक्टर कोरोनायोद्धा ठरत आहेत तर, काही डॉक्टर वैद्यकिय सेवेच्या नावाखाली चांगलीच बोळवण करीत असल्याचे चित्र कारंजा तालुक्यातील काही खाजगी रुग्णालयांमध्ये दिसत आहे. सदर, प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.

आम्ही आमची ड्युटी करतो....नि मोकळे होतो
या अस्वच्छतेबाबत रुग्णालयातील स्टाफला विचारणा केल्यास तुम्हाला इतकीच काळजी असेल तुमची तर, तुम्ही घरुनच पाणी आणा आम्हीच तर घरून पाणी आणतो. जीव मुठीत घेऊन ड्यूटी करतो नि मोकळे होतो, असे उत्तर दिल्या जाते. शिवाय रुग्णाचे नातेवाईक सुद्धा त्यांच्या आप्त स्वकीयांची प्रकृती स्थिरावण्याकडे व्यस्त असल्याने तक्रारीच्या भानगडीत पडत नसल्याने हे प्रकार वाढतच चालले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Biomedical waste is dumped near drinking water at Karanja!