esakal | पक्षांतराचे साईड ईफेक्ट: दोन कोटींच्या विकासकामांवरून काँग्रेस-शिवसेनेत संघर्ष
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Congress-Shiv Sena struggle over development works worth Rs 2 crore

आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. तर, शिवसेनेच्या गोटातील काही जण काँग्रेसच्या तंबूत दाखल झाले आहेत. पक्षांतराच्या या भाऊगर्दीमुळे मोताळा शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता दोन कोटी रुपयांच्या विकास कामांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मात्र सर्वसामान्यांना राजकारणाशी सोयरसुतक नसून, शहराच्या विकासाची अपेक्षा आहे, एवढे मात्र खरे.

पक्षांतराचे साईड ईफेक्ट: दोन कोटींच्या विकासकामांवरून काँग्रेस-शिवसेनेत संघर्ष

sakal_logo
By
शाहीद कुरेशी

मोताळा (जि.बुलडाणा) :  आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. तर, शिवसेनेच्या गोटातील काही जण काँग्रेसच्या तंबूत दाखल झाले आहेत. पक्षांतराच्या या भाऊगर्दीमुळे मोताळा शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता दोन कोटी रुपयांच्या विकास कामांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मात्र सर्वसामान्यांना राजकारणाशी सोयरसुतक नसून, शहराच्या विकासाची अपेक्षा आहे, एवढे मात्र खरे.

आ. गायकवाड दिशाभूल करीत आहेत, नगराध्यक्ष सोपान धोरण यांचा पत्रकार परिषदेत आरोप
आमदार संजय गायकवाड यांनी मोताळा शहरासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला, तर तो निधी कुठे आहे? या निधी संदर्भात नगरपंचायतीला शासन अथवा संबंधीत यंत्रणेकडून अद्याप कोणत्याही प्रकारचा आदेश मिळाला नाही. त्यामुळे आ. गायकवाड यांनी विकास कामाच्या नावावर जनतेची दिशाभूल करू नये, असे नगराध्यक्ष सोपान धोरण यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आमदार संजय गायकवाड यांनी नगरविकास विभागाकडून मोताळा शहरासाठी दोन कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करून आणली. परंतु नगरपंचायत प्रशासन या विकास कामांमध्ये खोळंबा घालत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता.

दरम्यान, नगराध्यक्ष सोपान धोरण यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व विभागांनी पुढील आदेशापर्यंत कोणताही बांधकाम हाती घेऊ नये, असा शासन निर्णय ता.४ मे रोजी निर्गमित केला आहे. त्यामुळे मोताळा नगरपंचायत विकास कामांबाबत ठराव देत नाही, असा कांगावा करून विरोधकांनी बिनबुडाचे आरोप करू नये.

शिवसेनेच्या वतीने काँग्रेस नगर सेवकांच्या घरी जाऊन विकास कामांच्या नावावर खोट्या स्वाक्षऱ्या घेतल्या, असा आरोप नगराध्यक्ष श्री धोरण व गट नेते शेख सलीम बाबा यांनी केला आहे. विरोधकांनी राजकारण करून शक्ती पणाला लावण्यापेक्षा दोन कोटींची कामे करून दाखवावी, असा टोला श्री धोरण यांनी लगावला. तर, आ. गायकवाड यांनी मोताळा शहराच्या विकासासाठी केव्हाही निधी आणल्यास त्यांचे स्वागतच आहे, असे काँग्रेस नेते शरदचंद्र पाटील व नाना देशमुख यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष सोपान धोरण, गट नेते शेख सलीम बाबा, काँग्रेस नेते शरदचंद्र पाटील, नाना देशमुख, डॉ. सपकाळ, प्रदीप जैन, रवि पाटील, विजय सुरडकर, लता पारस्कर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व दहा नगरसेवकांची उपस्थिती होती.

दोन कोटींची कामे करून दाखवणार, आमदार संजय गायकवाड यांचा निर्धार
मोताळा शहरासाठी आपण दोन कोटींच्या विकास कामांना मंजूरात मिळवली आहे. याबाबत संबंधीत यंत्रणेने नगरपंचायतीला नाहरकत व इतर प्रमाणपत्र मागितली. मुख्याधिकाऱ्यांनी सभा लावण्याबाबत दोन वेळा पत्र दिले. परंतु बांधकाम विभागाने कामे केल्यास आपल्या कमिशनचे काय, यामुळे नगरपंचायत प्रशासन या कामात खोळंबा घालत आहे, असा गंभीर आरोप आ. संजय गायकवाड यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.


दोन कोटी रुपयांच्या विकास कामांबाबत आ. गायकवाड दिशाभूल करीत असल्याचा आरोप नगराध्यक्ष सोपान धोरण व सहकाऱ्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेतून केला होता. या पार्श्वभूमीवर आ. गायकवाड यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, चार मे रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व विकास कामांना स्थगिती देण्यात आली. परंतु मोताळा शहरातील दोन कोटींच्या विकास कामांना २२ जून रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरात मिळाली आहे. नगरपंचायतीला याबाबत कोणताच पत्र मिळाले नसल्याचा आरोप खोटा आहे.

वास्तविक सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन वेळा नगरपंचायत प्रशासनाला पत्र देऊन नाहरकत व इतर आवश्यक प्रमाणपत्र मागितले. मुख्याधिकाऱ्यांनी ता. ९ जुलै व ७ ऑगस्ट रोजी नगराध्यक्ष सोपान धोरण यांना सभा लावण्याबाबत पत्र व्यवहार केला आहे. परंतु त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. दरम्यान, नगरपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे सभा बोलवण्याची मागणी केली.

त्यामुळे आपले पितळ उघडे पडू नये या भीतीने नगरपंचायत प्रशासनाने १४ सप्टेंबरला सभा बोलावली आहे. नगरपंचायतने जर ठराव दिला नाही तर, कलम ३०९ नुसार विशेष सभा बोलावून ठराव पारित करण्यात येईल. तसेच दोन कोटींची कामे कोणत्याही परिस्थितीत करून दाखवीन, असा निर्धार आ. गायकवाड यांनी व्यक्त केला. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून, विकास कामांबाबत सत्य जनतेसमोर आणण्यासाठी हिम्मत असेल तर जनता दरबार बोलवा, असे आव्हान आ. गायकवाड यांनी दिले आहे. यावेळी शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांची उपस्थिती होती.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image