
गत पाच वर्षापूर्वी वाशीम-पुसद-कारंजा महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचा मुहूर्त निघाला होता. दररोजच्या खोळंब्यातून आतातरी सुटका होईल अशी आशा असताना तब्बल पाच वर्षानंतरही या पुलाचे बांधकाम पूर्ण झालेच नाही.
वाशीम : गत पाच वर्षापूर्वी वाशीम-पुसद-कारंजा महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचा मुहूर्त निघाला होता. दररोजच्या खोळंब्यातून आतातरी सुटका होईल अशी आशा असताना तब्बल पाच वर्षानंतरही या पुलाचे बांधकाम पूर्ण झालेच नाही.
सध्या मालगाड्यांची आवक व इंजिन जोडणीसाठी या महामार्गावरील फाटक दिवसातून सात ते आठ वेळा बंद होत असल्याने वाहतूक तुंबून प्रचंड खोळंबा होत आहे.
अकोला पूर्णा रेल्वेमार्गाचे रूंदीकरण झाल्यानंतर या मार्गावर प्रवासी व मालगाड्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे खासदार भावना गवळी यांच्या पाठपुराव्यामुळे या लोहमार्गावर वाशीम-पुसद-कारंजा महामार्गावर एक तर, वाशीम-हिंगोली महामार्गावर दुसरा उड्डाणपूल मंजूर झाला होता.
पाच वर्षापूर्वीच या दोन्ही पुलाच्या कामाला मंजुरात मिळून काम सुरू झाले होते. वाशीम-पुसद मार्गावरील रेल्वेगेट जवळील उड्डाणपुलाचे दोन्ही बाजूचे बांधकाम वर्षभरापूर्वीच पूर्ण झाले आहे. मध्य॔तरी कोरोनाने हे काम बंद पडले होते मात्र, महिनाभरापासून काम सुरू असले तरी कामाची गती पाहता आणखी वर्षभर तरी काम पूर्ण होईल की, नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
पाच किलोमीटर लागतात वाहनाच्या रांगा.
सध्या प्रवासी गाड्याची संख्या रोडावली असली तरी मालवाहू रेल्वेगाड्यांच्या संखेत वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसातून सात ते आठ वेळा हे रेल्वेफाटक बंद होते. रेल्वेस्थानक पाचशे मीटरच्या आत असल्याने रेल्वेगाडी येण्याआधीच फाटक बंद होते. किमान अर्धातास हे फाटक बंद राहत असल्याने दोन्ही बाजूने तब्बल पाच किलोमीटर अंतरावर वाहतूक तुंबते. नंतरही वाहतूक सुरळीत होण्यासाठी एका तासाच्यावर वेळ जात असल्याने दीड तास हा मनस्ताप सहन करावा लागतो.
रुग्णांसाठी जीवघेणा प्रकार
दर तीन चार तासाने दीड तास वाहतूक तुंबत असल्याने याचा सर्वाधिक त्रास रुग्णांना सहन करावा लागतो. रुग्णवाहीका समोर निघतच नसल्याने रुग्णांवर रुग्णवाहीकेतच तळमळल्याशिवाय इलाज राहत नाही. उपचाराला विलंब होत असल्याने अनेक रुग्णांवर जीव गमावावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
वाहतूक शाखेला जबाबदारी आठवेणा!
रेल्वेगेट बंद झाल्यानंतर प्रत्येक वाहनधारक मन मानेल तिथे आपले वाहन घुसवितो. दोन चारचाकी वाहने समोरासमोर येत असल्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो. या महामार्गाला दोन लेन आहेत. याबाबत शहर वाहतूक शाखा कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने या फाटकावर वाहनांचा बाजार भरतो. रेल्वेफाटक बंद झाल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे दोन शिपाई दोन बाजूला उभे केले तर ही समस्या काही प्रमाणात सुटू शकेल.
(संपादन - विवेक मेतकर)