esakal | कोरोनामुळे बिघडले शिक्षणाचे गणित

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे बिघडले शिक्षणाचे गणित
कोरोनामुळे बिघडले शिक्षणाचे गणित
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरपूर जैन (जि.वाशीम) - कोरोना मुळे मागील वर्षी शाळा वर्षभर बंद राहिल्यात. पहिल्या वर्गातील मुले- मुली शाळेत गेलेच नाहीत. केवळ साधन सुविधा असणाऱ्यांनीच ऑनलाईन धडे गिरवले. आता हे विद्यार्थी परीक्षा न देताच दुसऱ्या वर्गात गेलीत. त्यामुळे त्यांचा पाया कच्चा राहणार आहे. चौथ्या वर्गापर्यंत च्या मुलांचेही असेच असून कोरोनामुळे एकूणच मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.

ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबातील विद्यार्थ्यांना अँड्रॉइड स्मार्टफोन हाताळता येत नाही किंवा अनेकजण तो परिस्थितीमुळे विकतही घेऊ शकत नाहीत. चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना यातील ज्ञान फार कमी असते.त्यामुळे पालकांसह चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. असे असताना शाळा व शिक्षकांना न पाहतच पहिलीच्या मुलांना दुसऱ्या वर्गात दाखल करण्यात आले. दुसरी मध्ये जाऊन सुद्धा या मुलांना अबकड व बेचे पाढे येणार नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शासनाने शाळा,महाविद्यालय बंद ठेवली आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धती अवलंबली गेली. मात्र ग्रामीण भागात या प्रणालीचा फारसा उपयोग झाला नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. स्मार्टफोन नाहीत नेटवर्कची तथा इंटरनेट ची समस्या आहे. शेतकरी मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या पालकांची मुले ऑनलाईन शिक्षण घेण्यास असमर्थ असल्याचे दिसून येते.तेव्हा कोरोनामुळे सध्या शिक्षणाचे पूर्ण गणित बिघडले असून,विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचा पायाच कच्चा राहिल्याने पुढील शिक्षण कसे होणार? असा प्रश्न अनेक पालकांना पडला आहे.

संपादन - विवेक मेतकर