Video : एकीकडे पाण्याचा विसर्ग; दुसरीकडे स्थिती चिंताजनक, जिल्ह्याच्या पाणासाठ्यात विरोधाभास

सुगत खाडे  
Wednesday, 5 August 2020

जिल्ह्यातील दोन प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्‍यात यावर्षी विरोधाभासी चित्र पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात नेहमीच लवकर पाणीसंग्रहित होत असलेल्या अकोट तालुक्यातील वान प्रकल्पात अद्यापर्यंत मोजकेच पावसाचे पाणी संग्रहित होऊ शकले आहे;

अकोला  ः जिल्ह्यातील दोन प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्‍यात यावर्षी विरोधाभासी चित्र पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात नेहमीच लवकर पाणीसंग्रहित होत असलेल्या अकोट तालुक्यातील वान प्रकल्पात अद्यापर्यंत मोजकेच पावसाचे पाणी संग्रहित होऊ शकले आहे;

तर दुसरीकडे नेहमीच पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याने भरणारे बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा धरणात मात्र यावर्षी पाणीसाठा ९० टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मॉन्सूनच्या सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांची पाणीपातळी तळ गाठत होती. या स्थितीमुळे शहरी व ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी साठवलेल्या पाण्याची उचल सुद्धा वाढली होती. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात सुद्धा सातत्याने घट होत होती. परिणामी जोरदार पाऊस न झाल्यास जिल्हावासियांना पेयजल संकटाला सुद्धा सामोरे जावे लागू शकते, अशी स्थिती निर्माण झाली होती; परंतु मध्यंतरीच्या काळात बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा धरणाच्या पाणीग्रहण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काटेपूर्णा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत गेली.

दुसरीकडे पावसाळ्यात नेहमीच लवकर भरणाऱ्या अकोट तालुक्यातील वान धरणाची स्थिती मात्र यावर्षी विरोधाभासी आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगातून वाहून येणारे पाणी यावर्षी वान धरणात न पोहचल्याने किंबहुना यावर्षी वान धरणाच्या पाणीग्रहण क्षेत्रात जोरदार पाऊसच न झाल्याने या धरणात कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तर दुसरीकडे काटेपूर्णा धरणातून गत ४-५ दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
 

शेतकऱ्यांना भेडसावणार सिंचनाचा प्रश्न
वान धरणातून प्रत्येक वर्षी अकोट व तेल्हारा तालुक्यातील हजारो हेक्टर शेत जमिनीला सिंचनाला पाणी देण्यात येते. रबी हंगामात शेतीला पाणी मिळत असल्याने शेतकरी सुद्धा सुखावतात. परंतु यावर्षी धरणात अद्यापर्यंत कमी पाणी संग्रहित झाल्याने पुढील काळात दमदार पाऊस न झाल्यास सदर दोन तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. बार्शीटाकळीतील शेतकऱ्यांना मात्र यावर्षी रबी हंगामात सिंचनाला पाणी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
 
अशी आहे धरणांची स्थिती

  • वान धरणात पावसाच्या दोन महिन्यांनंतर सुद्धा अद्यापपर्यंत केवळ ४१.९६ टक्केच पाणी संग्रहित होऊ शकले.
  • काटेपूर्णा धरणात मात्र सध्या ८१.८२ टक्के पाणी आहे. १ जुलैरोजी याच धरणात ८६.५० टक्के पाणी संग्रहित होते. परंतु पाणीसाठ्‍यात निरंतर होत असलेली वाढ पाहता धरणातून गत ४-५ दिवसांपासून पाणी सोडण्यात येत आहे. मोर्णा प्रकल्प सुद्धा भरला असून त्यात ७७.९१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
  • निर्गुणा धरणात सुद्धा ५२.९३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. उमात सुद्धा ३८.८७ टक्केच पाणी संग्रहित असल्याने मोर्णा व काटेपूर्णा प्रकल्पाच्या तुलनेत या प्रकल्पांची स्थिती सुद्धा विरोधाभासी आहे.
  • (संपादन - विवेक मेतकर)
     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news Discharge of water on the one hand; The situation, on the other hand, is worrisome, contradictory to the water of the district